फक्त ३० मिनिटांत हनी सिंगने लिहिलेलं सलमानच्या 'या' चित्रपटासाठी रॅप सॉंग; अभिनेत्याने सांगितल्या खास आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:35 IST2024-12-24T13:31:35+5:302024-12-24T13:35:37+5:30
लोकप्रिय भारतीय हिप हॉप स्टार हनी सिंग (Honey Singh) सध्या त्याच्या 'यो यो हनी सिंग : फेमस' या लेटेस्ट डॉक्युमेंटरीमुळे चर्चेत आला आहे.

फक्त ३० मिनिटांत हनी सिंगने लिहिलेलं सलमानच्या 'या' चित्रपटासाठी रॅप सॉंग; अभिनेत्याने सांगितल्या खास आठवणी
Honey Singh: लोकप्रिय भारतीय हिप हॉप स्टार हनी सिंग (Honey Singh) सध्या त्याच्या 'यो यो हनी सिंग : फेमस' या लेटेस्ट डॉक्युमेंटरीमुळे चर्चेत आला आहे. या डॉक्युमेंटरी फिल्मच्या माध्यमातून हनी सिंगच्या आयुष्यातील प्रवास दाखविण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे देखील करण्यात आले आहेत. याच डॉक्यु-फिल्मध्ये अभिनेता सलमान खानने सुद्धा हनी सिंगबद्दल एक खास किस्सा शेअर केला आहे.
बरीच वर्षे बॉलिवूडमधून गायब झालेल्या हनी सिंगने २०१८ मध्ये इंडस्ट्रीत जोरदार कमबॅक केलं. हनी सिंगने बॉलिवूडमध्ये बऱ्याच सुपरहिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्याच्या चेन्नई एक्स्प्रेसमधील 'लुंगी डान्स', तसंच 'सिंघम रिटर्न्स' चित्रपटातील 'आता माझी सटकली', 'यारियां' मधील 'आज ब्लू है पाणी पाणी' या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश वेड लावलं. त्यासोबत हनी सिंगने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील 'लेट्स डान्स छोटू मोटू' हे गाणं गायलं आहे. याचा किस्सा सलमान खानने या डॉक्युमेंटरीमध्ये शेअर केला आहे.
त्यादरम्यान सलमान म्हणतो की, "मी हैदराबाद येथे चित्रपटाची शूटिंग करण्यात व्यस्त होतो. त्यावेळी माझ्या मनात हा विचार आला आणि मी हे गाण्याची जबाबदारी हनीवर सोपविली. त्यानंतर तो स्टुडिओमध्ये गेला आणि त्याने अर्ध्या तासात रॅप लिहिला. त्यामुळेच मी हनीला रिक्वेस्ट केली त्याने या गाण्यात आमच्यासोबत सामील व्हावं. कारण हे गाणं लहान मुलांनीही ऐकावं इतकं सुंदर होतं."
हनी सिंगनेही सांगितल्या खास आठवणी-
हनी सिंगने देखील या गाण्याच्या खास आठवणी या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितल्या आहेत. त्यावेळी तो म्हणतो, "सलमान खानने मला ते गाणं पाठवलं. मग तो म्हणाला हे गाणं तर तयार आहे. त्यामुळे मी या गाण्यासाठी रॅप सॉंग करावं, अशी त्याची इच्छा होती. अवघ्या दोन दिवसांवर या गाण्याचं शूट होतं. मला ते गाणं गाण्याची संधी त्याने दिली आणि त्यामधे मी रॅप सुद्धा करणं जमेल का अशी विचारणा त्याने केली होती."
दरम्यान, 'यो यो हनी सिंग : फेमस' या डॉक्यु-फिल्मचं दिग्दर्शन मोझेस सिंग यांनी केलं आहे. शिवाय ऑस्कर पुरस्कारविजेत्या निर्माता गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसद्वारे 'यो यो हनी सिंग : फेमस'ची निर्मिती करण्यात आली आहे.