गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची हृदयस्पर्शी कहाणी; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:16 IST2025-05-19T13:07:56+5:302025-05-19T13:16:00+5:30
गलवान खोऱ्यात शेवटच्या श्वासापर्यंत लढले; कर्नल संतोष बाबू यांची संघर्षमय कहाणी, 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची हृदयस्पर्शी कहाणी; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका
Salman Khan: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या दमदार चित्रपटांसाठी ओळखला जातो. आजही चाहत्यांचा त्याच्या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतो. अलिकडेच सलमानचा 'सिकंदर' हा चित्रपट रमजानच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. परंतु, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची फारशी चर्चा झाली नाही. या चित्रपटानंतर सलमान पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. सलमान सत्य घटनेवरील गलवान व्हॅली संघर्षावर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता सलमान खान प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते अपूर्व लाखिया यांच्यासोबत आगामी चित्रपटात एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी दोन हात करताना शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे, असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर सलमानने या चित्रपटासाठी पसंती दर्शवली असून तो लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या चित्रपटाचं टायटल अद्याप गुलदस्त्यात आहे. याशिवाय चित्रपटाचे निर्माते किंवा सलमान खानकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
कर्नल संतोष बाबू यांच्याबद्दल जाणून घ्या...
भारतीय सीमांचे रक्षण करतांना चीनी सैनिकांना हुसकावून लावतांना झालेल्या चकमकीत कर्नल संतोष बाबू शहीद झाले. शहीद कर्नल संतोष बाबू हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 105 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. प्रबोधिनीत असतानाही त्यांची ओळख कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय कॅडेट म्हणून ओळख होती. लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर १५ जून २०२० मध्ये चीनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान शहीद झालेले कर्नल बी. संतोष बाबू गंभीर जखमी झाल्याने शाहिद झाले. त्यावेळी गलवान खोऱ्यात तुंबळ चकमक होऊन भारताचे २० जवान धारातीर्थी पडले होते. तर भारतीय जवानांनी चीनच्या ४० हून अधिक सैनिकांना ठार केले होते.