"इथे मदत करण्याचे संस्कारच नाहीत...", राजपाल यादव प्रकरणानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीचं वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:45 IST2026-02-12T16:43:26+5:302026-02-12T16:45:47+5:30
"इथे कोणीही मदत करत नाही...", राजपाल यादव तिहार जेल सरेंडर प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्याचं स्पष्ट मत, इंडस्ट्रीची केली पोलखोल

"इथे मदत करण्याचे संस्कारच नाहीत...", राजपाल यादव प्रकरणानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीचं वास्तव
Rajpal Yadav Case: सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चा जर कोणाची होत असेल तर तो अभिनेता राजपाल यादव आहे. अभिनेता राजपाल यादवने काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. १० वर्षे जुन्या चेक बाउन्स प्रकरणात त्याच्याविरुद्ध ९ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपालने एका चित्रपटासाठी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडण्यात तो अपयशी ठरल्याने त्याने स्वत तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. त्यानंतर अभिनेत्याच्या मदतीसाठी संपूर्ण बॉलिवूड एकवटलं आहे. याचदरम्यान, अभिनेते गोविंद नामदेव यांनी चित्रपटसृष्टीबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
अलिकडेच गोविंद नामदेव यांनी राजपाल यादवच्या या प्रकरणावर भाष्य केलं. 'द लल्लनटॉप' सोबत संवाद साधताना अभिनेत्याला एक प्रश्न विचारण्यात आला की, याआधी राजपाल यादव बद्दल, अनेक कलाकारांनी सांगितलंय... राजपालने त्यांच्या वाईट काळात त्यांना खूप साथ दिली होती. मात्र, आज त्याला गरज आहे, पण त्याच्यासोबत कोणीही नाही. त्यावर उत्तर देताना गोविंद नामदेव म्हणाले,"मी अनेकदा पाहिले आहे की जेव्हा बॉलिवूडमध्ये अशी घटना घडते तेव्हा कोणीही मदत करत नाही. कारण, असं घडलंय आणि यापुढे सुद्धा हीच परिस्थिती असणार आहे. "
मग ते म्हणाले,"आपल्या कठीण प्रसंगात कोणीही मदतीला येत नाही. यामागे ज्याचे -त्याचे विचार आणि संस्कारांचा तो भाग असतो. त्यामुळे एखाद्याला मदत करण्याचे संस्कार त्यांच्यामध्ये नसतात. ही इंडस्ट्रीच अशी ही जी माणसाला असं बनवते. "
राजपाल यादवबद्दल ते मुलाखतीत म्हणाले,"राजपालसोबत जे घडलं त्याचा मी साक्षीदार आहे. तो नकळतपणे एका कठीण परिस्थितीत सापडला. हे खूप दुःखद आहे. तो इतका गोड माणूस आहे की त्याची कोणाशीच तुलनाच होऊ शकत नाही. पण आयुष्यात कधीकधी अशा गोष्टी घडतात. आता त्याने ते स्वीकारलं आहे, काही हरकत नाही. परंतु,आता त्याचे भविष्यातील नक्कीच चांगले दिवस येतील."अशा भावना त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केल्या.