"ती पाणी मागत होती, पण मी...", आईच्या अखेरच्या क्षणाबद्दल सांगताना अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी, आजही वाटतेय एका गोष्टीची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:23 IST2025-10-30T09:17:59+5:302025-10-30T09:23:32+5:30
"त्यावेळी आईला पाणी दिलं असतं तर...", बॉलिवूड अभिनेत्याने सांगितली वेदनादायी आठवण, काय घडलेलं?

"ती पाणी मागत होती, पण मी...", आईच्या अखेरच्या क्षणाबद्दल सांगताना अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी, आजही वाटतेय एका गोष्टीची खंत
Arshad Warsi: मनोरंजनविश्वातील कलाकार मंडळींना अनेकदा चेहऱ्यावर हास्य ठेवूनच काम करावं लागतं. वैयक्तिक आयुष्यात आपण कितीही दु:खी असलो तरी इमाने इतबारे करावं लागतं. आयुष्यातील अशाच एका कठीण प्रसंगाबद्दल एका अभिनेत्याने सांगितलं आहे.या अभिनेत्याचं नाव म्हणजे अर्शद वारसी. अर्शदने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण, त्याला मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातून खरी ओळख मिळाली.
अर्शदच्या वडिलांनी अभिनेत्री रंजना सचदेवशी लग्न केलं होतं. मात्र,या कुटुंबावर काळाने घाला घातला. अर्शद १४ वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावरचं छप्पर गेलं आणि तो अनाथ झाला. त्यानंतर आयुष्यात त्याने बरेच कष्ट सोसले. इतकंच नाहीतर अर्शदला दहावीत शिक्षण सोडावं लागलं. अशातच नुकतीच अर्शद वारसीने राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्याने आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितलं. तसेच काही भावुक आठवणी देखील शेअर केल्या. दरम्यान, या मुलाखतीमध्ये अर्शद म्हणाला, "जेव्हा कोणी मला माझ्या बालपणाबद्दल विचारतं तेव्हा सगळ्यात आधी कुटुंबापेक्षा शाळेची आठवण येते. कारण, मी ८ वर्षांचा असताना बोर्डिंगमध्ये होतो. "
आईच्या आठवणीत अभिनेता भावुक...
त्यानंतर अर्शदने त्याच्या आईबद्दल भावुक आठवण शेअर केली. वडिलांच्या निधनानंतर आईची किडनी फेल झाली आणि ती डायलिसीसवर होती.या दु: खातून अभिनेता अजूनही सावरलेला नाही. यावेळी आईची वेदनादायी आठवण सांगताना तो म्हणाला," माझी आई एक गृहिणी होती. ती उत्तम स्वयंपाक बनवायची. मात्र, किडनी फेल्यूअर झाल्यामुळे डॉक्टरांनी तिला पाणी देऊ नये असं सांगितलं होतं. पण, ती सारखी पाणी मागायची. ती तिच्या शेवटच्या क्षणी माझ्याकडे पाणी मागत होती, पण मी देऊ शकलो नाही. त्याच रात्री ती गेली. "
स्वत: लाच दोष देत होतो…
मग पुढे अभिनेता म्हणाला,"कधी कधी मला असं वाटतं मी जर तिला पाणी दिलं असतं तर ती गेली नसती. मी स्वत: लाच दोष देत होतो. आता मला वाटतं मी त्यावेळी तिला पाणी द्यायला पाहिजे होतं. तेव्हा मी लहान होतो आणि डॉक्टरांचं ऐकलं. पण,आपण कधीकधी रुग्णाचंही ऐकायला हवं. त्याच्या मनाचा आपण फार कमी विचार करतो."असा भावुक किस्सा अभिनेत्याने शेअर केला.
वर्कफ्रंट
अर्शद वारसीने 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. या चित्रपटानंतर त्याने 'हासिल', 'गोलमाल सीरिज', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई', 'जॉली एलएलबी-२' अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.