बॉलिवूड गाजवल्यानंतर आमिर खानची साउथमध्ये एन्ट्री; 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:57 IST2025-06-05T15:49:03+5:302025-06-05T15:57:47+5:30
आमिर खानला लवकरच दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार, मोठी अपडेट समोर

बॉलिवूड गाजवल्यानंतर आमिर खानची साउथमध्ये एन्ट्री; 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत करणार काम
Aamir Khan : हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे आमिर खान (Aamir Khan). लवकरच आमिर 'खान सितारे जमीन पर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटानंतर अभिनेता जवळपास तीन वर्षानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. याचदरम्यान एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. हिंदी चित्रपटानंतर बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने साउथ इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'सितारे जमीन पर'नंतर, आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची जोडी 'दादासाहेब फाळके' यांच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी एकत्र येणार आहे. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, फाळके यांच्या संघर्षमय प्रवासाचे चित्रण या चित्रपटात दिसेल. त्यानंतर आमिर खान प्रसिद्ध साउथ दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. आमिरचा हा चित्रपट एका सुपरहिरोवर आधारित असेल. या प्रोजेक्टमध्ये आमिर खान पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम करणार आहे. मिळालेल्या माहितीनूसार, आमिर खानने या नवीन प्रोजेक्टला होकार दर्शवला आहे. लोकेश कनागराजसोबतचा हा त्याचा पहिला चित्रपट असेल ज्याचे शूटिंग पुढील वर्षी २०२६ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, लोकेश कनागराज हे दक्षिणेतील मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत, ज्यांनी 'लिओ', 'कैथी', 'मास्टर', 'कुली' आणि 'विक्रम' सारखे उत्कृष्ट चित्रपट बनवले आहेत.