"रोज रात्री घरी जाऊन रडायचो…", मिस्टर फरफेक्शनिस्ट आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला-"एक वेळ अशी आली…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:45 IST2025-12-08T11:42:25+5:302025-12-08T11:45:17+5:30
संघर्ष कुणालाच चुकलेला नाही! आमिर खानला आठवले जुने दिवस,म्हणाला-"स्वतःला सिद्ध करावं लागलं..."

"रोज रात्री घरी जाऊन रडायचो…", मिस्टर फरफेक्शनिस्ट आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला-"एक वेळ अशी आली…"
Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर फरफेक्शनिस्ट अशी बिरुदावली मिरवणारा अभिनेता म्हणजे आमिर खान (Aamir Khan). एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच आमिर खान एक उत्तम निर्माता आणि दिग्दर्शकही आहे. 'राजा हिंदुस्तानी' मधील टॅक्सी ड्रायव्हर राजा ते 'तारे जमीन पर', 'लगान', 'सरफरोश', 'दिल ', 'कयामत से कयामत तक' आणि ,'पीके' ते'धूम 3' मधील अट्टल चोर अशा चित्रपटांमध्ये त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. अनेकदा तो इंडस्ट्रीतील कलाकार, चित्रपट तसेच इतर काही गोष्टींबद्दल काही गोष्टींबद्दल प्रतिक्रिया देत असतो.
आमिर खान हा सध्याच्या घडीला इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता. 'कयामत से कयामत तक' हा त्याचा करिअरमधील पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. पण, त्यानंतर अभिनेत्याला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला. चित्रपट चांगली कमाई करत नसल्यामुळे निर्मात्यांनी देखील त्याच्याकडे पाठ फिरवली होती.
अलिकडेच, एका मुलाखतीदरम्यान, आमिर खानने त्याच्या पहिल्या चित्रपट 'कयामत से कयामत तक'च्या यशानंतर आलेल्या वाईट काळातील अनुभव शेअर केला. तेव्हा तो म्हणाला, मला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या, पण ज्या दिग्दर्शकांसोबत माझी काम करण्याची इच्छा होती त्यांच्याकडून मला ऑफर येत नव्हत्या.मला ज्या दिग्दर्शकांसोबत काम करायचं होतं याची भलीमोठी यादी मी केली होती, पण त्यापैकी कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही.यावेळी आमिरने असंही सांगितलं की, कयामत से कयामत तक सारख्या सुपरहिट चित्रपटानंतरही स्वतःला स्टार म्हणून सिद्ध करावं लागलं."
एकाच वेळी ८-९ चित्रपट साइन केले अन्...
यापुढे आमिर खानने सांगितलं, त्यावेळेस त्याने एकाच वेळेस जवळपास ८-९ चित्रपट साईन केले होते. अखेर शूटिंग सुरु झाल्यानंतर त्याला आपली चूक उमगली. तो म्हणाला, "मी एका वेळी दोन-तीन चित्रपट करण्यासाठी बनलेलो नाही,कारण माझे सुरुवातीचे 'लव्ह लव्ह लव्ह', 'अव्वल नंबर', 'तुम मेरे हो' आणि'जवानी जिंदाबाद' हे चित्रपट थिएटरमध्ये वाईटरित्या फ्लॉप झाले. "
घरी जाऊन रडायचा अभिनेता...
आमिर म्हणाला, “एक वेळ अशी आली जेव्हा माझे सर्व चित्रपट फ्लॉप होऊ लागले, एक फ्लॉप झाला, नंतर दुसरा फ्लॉप झाला आणि नंतर तिसरा देखील.यानंतर माध्यमांनी मला 'वन फिल्म वंडर'चा टॅग दिला.हे पाहून मला वाटू लागले की कदाचित मी काम बरोबर करत नाहीये आणि मग रोज रात्री मी घरी जाऊन रडायचो. यानंतर, मी ठरवलं की, जोपर्यंत मी दिग्दर्शकावर विश्वास ठेवत नाही, मला पटकथा आवडते आणि निर्माता असा आहे जो तो चांगल्या प्रकारे तयार करू शकतो आणि प्रदर्शित करू शकतो तोपर्यंत मी कोणताही चित्रपट साइन करणार नाही. मला असं वाटलं की माझं करिअर संपलं आणि मला कोणीही वाचवू शकणार नाही. पण, त्यामुळे माझ्यात चित्रपटाला 'नाही' म्हणण्याचा आत्मविश्वास आणि धाडस आलं."