मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:22 IST2025-05-18T14:22:04+5:302025-05-18T14:22:17+5:30
मिथुन चक्रवर्तींना नोटीस का पाठवण्यात आली?

मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
BMC Send Notice To Mithun Chakraborty: 'डिस्को डान्सर' म्हणून प्रसिद्ध असलेले दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. मिथुन चक्रवर्ती हे केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता, आता राजकारणातही सक्रीय योगदान देत आहेत. मात्र, अलिकडेच ते चर्चेत आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) त्यांच्या विरुद्ध बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस बजावली आहे.
बीएमसीनं मिथुन चक्रवर्ती यांना बेकायदेशीर ग्राउंड फ्लोअरच्या बांधकामासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे बांंधकाम मलाडच्या मढ परिसरातील एरंगल गावात असल्याचं म्हटलं जातं आहे. दैनिक जागरण नुसार, ही नोटीस मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३५१(१A) अंतर्गत १०मे रोजी जारी करण्यात आली. त्यानुसार, मिथुन यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्या दरम्यान त्यांनी हे बांधकाम कायदेशीर असल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. जर त्यांनी यासाठी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही, तर बीएमसी हे बांधकाम पाडण्याची तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्याची शक्यता आहे.
मिथुन चक्रवर्तींचा खुलासा
या प्रकरणावर मिथुन चक्रवर्ती यांनीही मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांनी आपलं बांधकाम पूर्णतः कायदेशीर असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, "फक्त मलाच नाही, तर अनेक लोकांना अशाच स्वरूपाच्या नोटिसा मिळाल्या आहेत. सर्वजण आपापले उत्तर बीएमसीकडे सादर करत आहेत".
BMC कडून अवैध बांधकामांवर कारवाई सुरू
माध्यमांच्या माहितीनुसार, बीएमसी मढ परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांविरोधात कडक कारवाई करत आहे. सध्या या भागात सुमारे १०१ बेकायदेशीर बांधकामे ओळखली गेली आहेत, ज्यापैकी अनेक बांधकामे बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आल्याचं समोर आलं आहे. बीएमसीने मे अखेरपर्यंत ही सर्व बांधकामे हटवण्याचा निर्धार केलाय. यामुळे आता 'डिस्को डान्सर' यांच्या घरावर प्रत्यक्षात बुलडोजर चालणार? की स्थितीतून मिथुन चक्रवर्ती कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.