सुशांत सिंह प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; कोर्टानं दिले महत्त्वाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 14:50 IST2024-03-07T14:46:09+5:302024-03-07T14:50:23+5:30
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रियाला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती.

सुशांत सिंह प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; कोर्टानं दिले महत्त्वाचे आदेश
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर रिया चक्रवर्तीच्या परदेश प्रवासावरही कोर्टात बंदी घालण्यात आली होती. मात्र आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. मुंबईच्या विशेष न्यायालयाकडून तिला परदेशात जाण्याची परवानगी मिळाली आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रियाला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. अटकेनंतर सुमारे महिनाभरात मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात रियाशिवाय तिचा भाऊ शौविक आणि इतरही अनेक आरोपी आहेत. आता रियासोबतच शौविकलाही विदेशात प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईतील विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्तीला तिच्या कुटुंबासह परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाने तिला होळी साजरी करण्यासाठी श्रीलंकेला जाण्याची परवानगी दिली. एनडीपीएस कायद्याशी संबंधित खटल्यांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश केपी क्षीरसागर यांनी तिच्या याचिकेवर निर्णय दिलाय.
संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करत होता, त्याचवेळी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची माहिती समोर आली होती. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. अभिनेत्यानं वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. सुशांत सिंग राजपूतचं 14 जून 2020 रोजी निधन झालं होतं. अभिनेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंग राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. प्रदीर्घ तपासानंतर अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणातही अटक करण्यात आली होती.