तख्त या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 13:19 IST2019-02-26T13:15:06+5:302019-02-26T13:19:07+5:30
भूमीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आता चार वर्षं पूर्ण होणार आहेत. या चार वर्षांत भूमीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. या वर्षांत तर तिचे पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

तख्त या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार या भूमिकेत
भूमी पेडणेकरने दम लगा के हैशा या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी पुरस्कार मिळाले. ती लंबे रेस का घोडा असल्याचे तिने पहिल्याच चित्रपटाद्वारे दाखवून दिले होते. आजवर तिने टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. भूमीचा पहिला चित्रपट २७ फेब्रुवारी २०१५ ला प्रदर्शित झाला होता. म्हणजेच भूमीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आता चार वर्षं पूर्ण होणार आहेत. या चार वर्षांत भूमीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. या वर्षांत तर तिचे पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सोनचिडिया हा तिचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
भूमीने आज एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. याविषयी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, मला नेहमीच अभिनेत्री बनायचे होते. पण माझ्या कुटुंबियातील कोणाचाही या इंडस्ट्रीशी काहीही संबंध नसल्याने या क्षेत्रात पदार्पण कसे करायचे हेच मला कळत नव्हते. पण माझ्या पालकांनी मला खूप चांगले शिक्षण दिले आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी दिली. मी अभिनेत्री बनण्याच्या काही वर्षं आधी माझ्या वडिलांचे निधन झाले. तेच माझे अँजल असून त्यांनीच माझ्या करियरला दिशा दिली असे मला वाटते. आज माझ्या पालकांमुळेच मी इथवर पोहोचू शकले आहे.
भूमी आता करण जोहरच्यातख्त या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाविषयी ती सांगते, या चित्रपटातील माझ्या भूमिकेविषयी जास्त काही मी सांगू शकत नाही. पण हे मी नक्कीच सांगेन की, आजवरच्या सगळ्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी असून मी एका मॉर्डन अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवरच्या माझ्या सगळ्या चित्रपटांमध्ये मी कधीच अतिशय श्रीमंत मुलीची भूमिका साकारलेली नाहीये. पण करणने मला या चित्रपटात खूपच श्रीमंत दाखवले आहे. त्यामुळे एक वेगळी भूमी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.