'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:55 IST2025-10-20T13:54:58+5:302025-10-20T13:55:41+5:30
अयान मुखर्जीला 'वॉर २'साठी दिग्दर्शन करताना म्हणावं तसं स्वातंत्र्यच मिळालं नाही.

'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
दिग्दर्शक अयान मुखर्जीचा काही महिन्यांपूर्वी 'वॉर २' रिलीज झाला होता. हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर सिनेमात आमने सामने होते. यशराज फिल्म्सचा हा सिनेमा जोरजार आपटला. अयान मुखर्जीचं दिग्दर्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं नाही. 'वॉर २' रिलीजआधी सिनेमाची प्रचंड हाईप होती. अयान मुखर्जी आता 'धूम ४'चंही दिग्दर्शन करणार अशी चर्चा होती. पण आता 'वॉर २'च्या अपयशानंतर अयानने 'धूम ४'मधून माघार घेतली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, 'वॉर २', 'धूम' सारखे सिनेमे आपल्यासाठी नाहीत असं अयानला वाटत आहे. रोमान्स, ड्रामा आणि आकर्षक स्टोरीटेलिंग असणारे सिनेमेच आपण करु शकतो अशी अयान मुखर्जीची धारणा झाली आहे. वॉर २ बद्दल बोलायचं तर श्रीधर राघवन यांनी जसं लिहिलं होतं तसंच अयानने पडद्यावर उतरवलं. स्क्रिप्ट आणि स्क्रीनप्लेमध्ये त्याने काहीच हस्तक्षेप केला नाही. त्याला वॉर वेळी दिग्दर्शनासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळालं नाही. खरंतर मेकर्सने हिंदी आणि साउथ प्रेक्षकांनाही खेचून आणण्यासाठी सिनेमात ज्युनिअर एनटीआरला घेतलं होतं. मात्र त्यांची ही स्ट्रॅटेजी चालली नाही. सिनेमाला आपलं बजेटही वसूल करता आलं नाही. म्हणूनच आता अयानने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून काढता पाय घेतला आहे. याबद्दल त्याने आदित्य चोप्राशी चर्चा केली असून त्याचं म्हणणं त्याला पटवून दिलं आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूरने 'धूम ४'साठीच आधीच तारखा दिल्या आहेत. आता आदित्य चोप्राने स्वत:च 'धूम ४'चं दिग्दर्शन करावं असं वायआरएफ टीमने त्याला सुचवलं आहे.
'ब्रह्मास्त्र २'ची तयारी
अयान मुखर्जी आता त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र २'कडे पूर्ण लक्ष देणार आहे. पुढील वर्षी सिनेमा ऑन फ्लोर येईल. सिनेमाच्या स्क्रिप्टिंगचं काम पूर्ण झालं आहे. हिमालयातील लोकेशनवरुन सध्या अयान स्क्रिप्टचं शेवटचं काम करत आहे. 'ब्रह्मास्त्र पार्ट १ शिवा' २०२२ साली रिलीज झाला होता. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट, मौनी रॉय, अमिताभ बच्चन, नागार्जुन यांची भूमिका होती. सिनेमाच्या शेवटी 'ब्रह्मास्त्र पार्ट २: देव'चीही झलक दिसली होती. आता देवच्या भूमिकेत कोण दिसणार याची तेव्हापासूनच चाहत्यांना उत्सुकता आहे. पार्ट १ मध्ये दीपिका पादुकोणचीही झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळे पार्ट २ मध्ये तिची मोठी भूमिका असण्याची शक्यता आहे. तर देवच्या भूमिकेत रणवीर सिंह, हृतिक रोशन, प्रभास या नावांची चर्चा होती.