'मला कोणाचा संसार मोडायचा नव्हता...'; विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात होत्या आशा पारेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 09:56 IST2026-03-17T09:55:39+5:302026-03-17T09:56:17+5:30
Asha parekh: आशा पारेख एकेकाळी प्रसिद्ध दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्या प्रेमात होत्या.

'मला कोणाचा संसार मोडायचा नव्हता...'; विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात होत्या आशा पारेख
बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे आशा पारेख (asha parekh). त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आशा पारेख यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. त्यामुळे त्यांच्या अभिनयाची छाप आजही चाहत्यांच्या मनावर पाहायला मिळते. विशेष म्हणजे पडद्यावर अनेक अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या आशा खऱ्या आयुष्यात मात्र एकट्याच राहिल्या. त्यांचं आजही अविवाहित राहण्यामागे एक दिग्दर्शक कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं.
आशा पारेख यांनी कायम त्यांच्या आयुष्यावर उघडपणे भाष्य केलं आहे. यात त्या त्यांच्या लव्हलाइफविषयीदेखील बऱ्याचदा व्यक्त झाल्या आहेत. आशा पारेख एकेकाळी प्रसिद्ध दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्या प्रेमात होत्या. मात्र, या जोडीच्या प्रेमाचं रुपांतर कधीच लग्नात झालं नाही. नुकतीच नासिर हुसैन यांची डेथ अॅनिव्हर्सरी झाली. या निमित्ताने आशा पारेख यांनी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी नासिर यांच्यासोबत असलेल्या अफेअरवर स्पष्टपणे भाष्य केलं.
नासिर यांच्या 'दिल दे के देखो' या सिनेमातून आशा यांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर या जोडीने अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केलं. यावेळी त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. परंतु, त्यावेळी नासिर हे विवाहित होते.
''नासिर साहेब एकमेव असे पुरुष होते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं. आजही करते. जर जगासमोर मी त्यांच्यावर केलेल्या प्रेमाचा स्वीकार केला नसता तर तो त्यांचा अपमान झाला असता. इतरांना याविषयी काय वाटतं हे मला माहित नाही. आणि, मला त्याविषयी काही बोलायचंही नाहीये. मला इतरांनापेक्षा माझ्या भावनांचा आदर करणं, त्याचा स्वीकार करणं जास्त महत्त्वाचं वाटतं आणि मला त्याचा गर्व सुद्धा आहे'', असं आशा पारेख म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, ''नासिर यांच्यासोबत असलेलं माझं नात मी कधीच कोणापासून लपवलं नाही. आणि, या नात्यामुळे नासिर यांच्या कुटुंबातही कोणता कलह झाला नव्हता. त्यांच्या पत्नीला आमच्या नात्याविषयी सगळं ठावूक होतं. आमचं नातं खूप निखळ आणि सामंजस्यपूर्ण होतं. मला माहित होतं की आमचं लग्न वगैरे कधीच होणार नाही. पण, मला फक्त त्यांच्या आयुष्यातील एक लहानसा भाग व्हायचं होतं. त्यांचं घर, संसार तोडावा हा विचार मी कधीच केला नाही. माझ्यात आणि त्यांच्या कुटुंबात कधीच मतभेद नव्हते.''
मला त्यांचा संसार मोडायचा नव्हता
''मी नासिर यांच्यावर प्रेम करायचे. पण, म्हणून त्यांचा संसार मोडावा असा विचारही कधी माझ्या मनात आला नाही. मला त्यांना त्यांच्या कुटुंबापासून तोडायचं नव्हतं.त्यांच्या कुटुंबात आणि माझ्यात चांगले संबंध होते. त्यामुळेच ज्यावेळी माझी बायोग्राफी लॉन्च झाली त्यावेळी नासिर यांची दोन्ही मुले नुसरत आणि इमरान हे उपस्थित होते. आणि, त्यांना पाहून मला खूप आनंद झाला होता.'' दरम्यान, आशा पारेख यांच्या द हिट गर्ल या बायोग्राफीमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याविषयी, करिअरविषयी अनेक खुलासे केले आहेत.