Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 09:23 IST2026-04-13T09:21:18+5:302026-04-13T09:23:16+5:30
Asha Bhosle Last Rites: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार, त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी दिली माहिती

Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं आणि संगीत क्षेत्रातील एक ताराच जणू निखळून पडला. शेवटच्या श्वासापर्यंत आशा भोसले या गात होत्या आणि सर्वांना पुन्हा पुन्हा त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पाडत होत्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरच त्यांनी मोहिनी घातली होती. आज त्यांना अखेरचा निरोप द्यायची वेळ आली आहे. त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी अधिक माहिती दिली आहे.
आनंद भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आज सोमवारी सकाळी साडेदहा ते दुपारी २ वाजेपर्यंत लोअर परळ येथील कासा ग्रँड येथे आशा ताईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणआर आहे. तर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. " अंत्ययात्रा होणार नाही आणि शिवाजी पार्क येथे जास्त गर्दी करु नये अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
लता मंगेशकर अन् आता आशा भोसले यांच्या निधनाचा योगायोग
गानसम्राज्ञी लता मंगेशकर ज्यांना सर्वजण दीदी म्हणत त्या आशाताईंसाठीही दीदी होत्या. दोघी सख्ख्या बहिणींचं भारतीय संगीत क्षेत्रातील योगदान कधीही न विसरता येणारं आहे. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी रविवारी लता मंगेशकर यांचं निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. तर काल रविवारच्याच दिवशी वयाच्या ९२ व्या वर्षीच आशा भोसलेंनीही जगाचा निरोप घेतला. हा योगायोग समजताच सर्वांच्याच डोळ्यात आपसूक पाणी आलं.