आर्यन खानच्या सीरिजमध्ये दिलजीतचं गाणं, शाहरुख खानने शेअर केला BTS व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:38 IST2025-09-12T14:37:35+5:302025-09-12T14:38:00+5:30
आर्यन खाननेही गायला इंग्रजी पार्ट, दिलजीत दोसांझ झाला शॉक

आर्यन खानच्या सीरिजमध्ये दिलजीतचं गाणं, शाहरुख खानने शेअर केला BTS व्हिडिओ
शाहरुख खानचा (Shahrukh Khan) लाडका लेक आर्यन खान (Aryan Khan) दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्याची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज येत्या काही दिवसात प्रदर्शित होत आहे. या सीरिजमधून आर्यनने बॉलिवूडची डार्क बाजू दाखवली आहे. विशेष म्हणजे सीरिजमध्ये शाहरुख, आमिर आणि सलमानचाही कॅमिओ आहे. तर लक्ष लालवानी, राघव जुयाल, सेहर बम्बा मुख्य भूमिकेत आहेत. आता सीरिजसंबंधी आणखी एक सरप्राईज समोर आलं आहे. या सीरिजमध्ये प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझनेही (Diljit Dosanjh)गाणं गायलं आहे. इतकंच नाही तर आर्यन खानने त्याला साथ दिली आहे. शाहरुख खानने दिलजीतचे आभार मानले आहेत.
शाहरुख खानने इन्स्टाग्रामवर गाण्याचा बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे. 'तेू की पता' हे ते गाणं आहे. व्हिडिओमध्ये आर्यन खान दिलजीतशी बोलताना चक्क दिलखुलास हसताना दिसतोय. दिलजीतच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचीही झलक दिसतेय. तर आर्यन गिटार वाजवत आहे. दोघं शाहरुख खानला व्हिडिओ कॉल करतानाचाही क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर झाला आहे. यामध्ये शाहरुख म्हणतो, 'आता आर्यन प्रसिद्ध होणार'. व्हिडिओच्या शेवटी दिलजीत इंग्रजी व्होकल ऐकतो आणि चकित होतो. तो आर्यनला म्हणतो, 'नो वे, ये आपने गाया है?'
हा व्हिडिओ शेअर करत शाहरुखने लिहिले, "दिलजीत पाजी, मनापासून आभार आणि बिग झप्पी. तू खूप प्रेमळ आणि गोड आहेस. आर्यनने तुला जास्त त्रास दिला नसेल अशी आशा आहे. लव्ह यू." तसंच दिलजीतने पोस्ट करत लिहिले,'माझा भाऊ आर्यनसोबत कोलॅब, आर्यन कमाल गायक आहे. जर हा म्युझिक इंडस्ट्रीत आला ना तर मी सांगतोय...सावध राहा.'
दिलजीत आणि आर्यनच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हे दोघं एकत्र आल्याने चाहत्यांना मोठं सरप्राईजच मिळालं आहे. तसंच आर्यनचा आवाज ऐकण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे.