"धुरंधरमध्ये २६/११ सीनच्या वेळी तू डान्स करत होतास...", चाहत्याच्या प्रश्नावर अर्जुन रामपाल म्हणाला- "माझ्या आयुष्यातील..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:46 IST2025-12-10T17:45:32+5:302025-12-10T17:46:36+5:30
'धुरंधर'मध्ये २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सीनही दाखवण्यात आला आहे. यामध्ये तो हल्ला टीव्हीवर बघताना ISI मेजर अर्जुन रामपाल आणि रहमान डकैतच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना हसताना दिसत आहेत. यावरुन एका चाहत्याने अर्जुन रामपालला या सीनबाबत विचारलं होतं.

"धुरंधरमध्ये २६/११ सीनच्या वेळी तू डान्स करत होतास...", चाहत्याच्या प्रश्नावर अर्जुन रामपाल म्हणाला- "माझ्या आयुष्यातील..."
जिकडेतिकडे सर्वत्र फक्त 'धुरंधर' सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेराच्या कामगिरीवर हा सिनेमा आधारित आहे. 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. त्याने भारतीय गुप्तहेर हमजा अली मझारी याची भूमिका साकारली आहे. 'धुरंधरमध्ये अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अक्षय खन्ना गँगस्टर रहमान डकैतच्या भूमिकेत आहे. तर अर्जुन रामपालने ISI मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे.
'धुरंधर'मध्ये २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सीनही दाखवण्यात आला आहे. यामध्ये तो हल्ला टीव्हीवर बघताना ISI मेजर अर्जुन रामपाल आणि रहमान डकैतच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना हसताना आणि डान्स करताना दिसत आहेत. तर भारतीय गुप्तहेर असलेल्या रणवीर सिंगच्या पायाखालची मात्र जमीन सरकते. यावरुन एका चाहत्याने अर्जुन रामपालला या सीनबाबत विचारलं होतं. अर्जुन रामपालने त्याच्या सोशल मीडियावरुन 'धुरंधर'साठी एक पोस्ट लिहिली होती. त्यावर चाहत्याने कमेंट केली होती.
"२६/११ चा सीन अंगावर येतो. एक प्रेक्षक म्हणून रणवीर सिंगने साकारलेल्या हमजाच्या भावना कळल्या. ज्या त्याने खूपच उत्कृष्टरित्या दाखवल्या आहेत. पण, एक भारतीय म्हणून तुम्हाला आणि इतर कलाकारांना तो सीन करताना काय वाटत होतं आणि सीन झाल्यानंतर काय भावना होत्या?", अशी कमेंट चाहत्याने केली होती. चाहत्याच्या या कमेंटला अर्जुन रामपालने उत्तर दिलं.

"हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण सीन होता", असा रिप्लाय अर्जुन रामपालने दिला आहे. दरम्यान, 'धुरंधर' सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धरने केलं आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत १५० कोटींचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर'चे शो हाऊसफूल होत आहेत.