Video: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहतीला अश्रू अनावर, अरिजीत सिंहने काय केलं पाहा; होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 11:13 IST2024-09-18T11:08:37+5:302024-09-18T11:13:20+5:30
चाहती म्हणाली, 'मला असं वाटलं देवच अरिजीतच्या माध्यमातून हे मला सांगत आहे. '

Video: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहतीला अश्रू अनावर, अरिजीत सिंहने काय केलं पाहा; होतंय कौतुक
अरिजीत सिंह (Arijit Singh) सध्याचा सर्वात आघाडीचा गायक आहे. त्याचं कोणतंही गाणं असो ते सुपरहिटच होणार हे निश्चितच असतं. अरिजीत सिंहला गाताना प्रत्यक्षात ऐकणं ही पर्वणीच असते. त्याचं गाणं म्हणजे एक थेरपी असते असंही अनेक चाहत्यांना वाटतं. नुकतीच लंडनमध्ये अरिजीतची कॉन्सर्ट झाली. यावेळी एका चाहतीला अश्रू अनावर झाले. तेव्हा अरिजीतने तिला कसं शांत केलं पाहा.
एका चाहतीने अरिजीतच्या लंडनमधील कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी ती भावूक झाली आणि अक्षरश: रडायला लागली. तिला रडताना पाहून अरिजीत स्टेजवर बसला आणि तिच्याकडे पाहत त्याने गाणं गायलं. तसंच तिला शांत व्हायला सांगितलं. चाहतीने लिहिले, "देव काही ना काही संकेत पाठवतो. आजची अरिजीतची कॉन्सर्ट त्याचाच प्रत्यय आहे. त्याने भावूक गाणी गायला सुरुवात केली आणि मला माझ्या लंडनमधील एक्स बॉयफ्रेंडची आठवण आली. ते वचन, विश्वासघात, खोटारडेपणा आणि प्रेमभंग हे सर्व आठवलं. त्या क्षणी अरिजीतने मी का रडत आहे हे माहित नसताना मला सांगितलं माफ कर आणि विसर."
"मला असं वाटलं देवच त्याच्या माध्यमातून हे मला सांगत आहे. मला माहितीये काही जण माझ्याशी सहमत असतील तर काही नसतीलही. आजची कॉन्सर्ट कायम लक्षात राहणारी आणि आयुष्यात नव्या कहाणीला जन्म देणारी ठरली. मी हे शेअर करत आहे कारण देव खरंच संकेत पाठवतो. आपल्याला फक्त शांत होऊन ऐकायचं असतं."
अरिजीतने 'वे कमलेया','ओ सजनी रे' ही गाणी गायली. याच कॉन्सर्टमध्ये एड शीरननेही ऑडियन्सला सरप्राईज दिलं. दोघांनी एडचं आयकॉनिक 'परफेक्ट' गाणं गायलं. अरिजीतला जगभरात कमालीचा प्रतिसाद मिळत आहे.