तुझी नवीन गाणी ऐकल्याशिवाय आम्ही कसे राहणार? अरिजीत सिंहच्या एक्स पत्नीची पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:17 IST2026-01-30T11:17:06+5:302026-01-30T11:17:45+5:30
एक्स पत्नीने अरिजीतचा उल्लेख 'भाई' असा केल्याने नेटकरीही चकित

तुझी नवीन गाणी ऐकल्याशिवाय आम्ही कसे राहणार? अरिजीत सिंहच्या एक्स पत्नीची पोस्ट व्हायरल
तरुणाईचा लाडका गायक अरिजीत सिंहने काही दिवसांपूर्वी प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना धक्काच बसला. नंतर त्याने स्वतंत्र म्युझिक बनवणार असल्याचं स्पष्ट केलं. याचा अर्थ अरिजीत आता सिनेमांसाठी पार्श्वगायन करणार नाही. यासोबत तो फिल्ममेकिंगही करणार आहे. आपल्या पहिल्या सिनेमात त्याने मुलालाच घेतलं आहे. तसंच तो राजकारणात उतरणार अशीही चर्चा रंगली आहे. दरम्यान अरिजीतच्या निर्णयानंतर त्याची एक्स वाईफ रुपरेखा बॅनर्जीने केलेली पोस्ट आता व्हायरल होत आहे.
रुपरेखा बॅनर्जी ही सुद्धा गायिका आहे. २००५ साली 'फेम गुरुकुल' शोमध्ये रुपरेखा आणि अरिजीत यांची ओळख झाली. रुपरेखा आणि काजी तौकीर त्या शोचे विजेते होते. नंतर अरिजीत आणि रुपरेखाने लग्न केलं. मात्र काही वर्षात त्यांचा घटस्फोट झाला होता. अरिजीतच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर रुपरेखा बॅनर्जीने पोस्ट केली आहे. ती लिहिते, "काय लिहू, काहीच समजत नाहीये. बरीच प्लेबॅक गाणी गायल्यानंतर आता जरा विश्रांती घे, थोडा आराम कर, मग पुन्हा उठून नवीन स्वतंत्र म्युझिक बनवायला घे. तुझी नवी गाणी ऐकल्याशिवाय आम्ही असं कधीपर्यंत राहू शकू? मी सुद्धा तुझ्या अगणित चाहत्यांपैकी एक आहे, खुश राहा भाई."
रुपरेखाने पोस्टमध्ये अरिजीतला भाई म्हटल्याने नेटकऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत. काही वर्षांपूर्वी रुपरेखाने अरिजीत सिंहसोबत लग्ना झाल्याचं वृत्त फेटाळलं होतं. तिने या अफवा असल्याचं सांगितलं होतं. मात्र अरिजीतकडून यावर कधीच काहीच स्पष्टीकरण आलं नाही. आता अरिजीतसाठी रुपरेखाची ही पोस्ट वाचून चाहतेही संभ्रमात पडले आहेत.
अरिजीतच्या पत्नीचं नाव कोयल रॉय आहे. कोयल आणि अरिजीत एकाच शाळेत होते. लहानपणापासून मित्र असले तरी त्यांच्यात प्रेमाचं नातं कधीच नव्हतं. अरिजीतचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यावर तो वाईट काळातून जात होता. तेव्हाच कोयलचाही पतीसोबत घटस्फोट झाला होता. दोघांनी एकमेकांना आधार दिला आणि २०१४ साली लग्नगाठ बांधली. आता अरिजीत आणि कोयल यांनी मिळून सिनेमाची स्क्रीप्टही लिहिली आहे. त्यांच्या याच सिनेमातून अरिजीतचा मुलगा पदार्पण करणार आहे. सोबत नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी असणार आहे.