अनुष्का शर्मा भारतात परतली, छोट्या 'अकाय'चीही दिसली झलक; पण म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 15:41 IST2024-04-16T14:23:13+5:302024-04-16T15:41:22+5:30
अनेक महिन्यांनी अनुष्का दोन्ही मुलांसह भारतात आली आहे.

अनुष्का शर्मा भारतात परतली, छोट्या 'अकाय'चीही दिसली झलक; पण म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) 15 फेब्रुवारी रोजी लंडनमध्ये 'अकाय'ला जन्म दिला. दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीपासूनच विराट आणि अनुष्का हे कपल लंडनमध्येच होतं. विचारपूर्वकच त्यांनी भारताबाहेर लंडनमध्ये बाळाला जन्म देण्याचं ठरवलं. २० फेब्रुवारी रोजी दोघांनी सोशल मीडिया पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली. दरम्यान विराट कोहली मार्च महिन्यात आयपीएल (IPL)साठी भारतात परतला. तर आता अनेक महिन्यांनी अनुष्काही दोन्ही मुलांसह भारतात आली आहे.
विराट आणि अनुष्का या लाडक्या जोडीची चाहते अनेक महिन्यांपासून आठवण काढत आहेत. विराट एकटाच आयपीएलसाठी भारतात आल्याने चाहते निराश झाले. अनुष्का विराटसोबत त्याला पाठिंबा देण्यासाठी येईल असंच चाहत्यांना वाटत होतं. पण आता अखेर अनुष्का मुंबईत आली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने इन्स्टाग्राम पेजवर माहिती शेअर केली आहे. अनुष्का दोन्ही मुलांसह मुंबईत पोहोचली असून तिने पापाराझींना 'अकाय'ची झलकही दाखवली. मात्र तिने फोटो काढण्यास मनाई केली. दोन्ही मुलं नसताना ती कॅमेऱ्यासमोर पोज देईल असं ती म्हणाली. तसंच लवकरच गेट टू गेदर करु असं आश्वासन तिने पापाराझींना दिलं.
अनुष्काचे फोटो जरी आले नसले तरी ती मुंबईत आल्याने चाहते खूष झालेत. कदाचित अनुष्का विराट कोहलीच्या RCB ला पाठिंबा देण्यासाठीही हजेरी लावू शकते. तसंच चाहते वामिका आणि अकायला बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र अनुष्काने यापूर्वीच नो फोटो पॉलिसी ठेवली आहे. तरी यावेळी अनुष्का अकायची नाही पण वामिकाची झलक नक्कीच दाखवू शकते अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत.