'धुरंधर २' सिनेमात 'प्रपोगंडा'! अनुपम खेर यांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "लाज वाटली पाहिजे!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:27 IST2026-03-22T11:25:33+5:302026-03-22T11:27:17+5:30
काही लोक धुरंधर २ या चित्रपटाला 'प्रपोगंडा' म्हणत आहेत. आता अनुपम खेर यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. काय म्हणाले?

'धुरंधर २' सिनेमात 'प्रपोगंडा'! अनुपम खेर यांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "लाज वाटली पाहिजे!"
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट असून अवघ्या तीन दिवसांत त्याने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षक आणि समीक्षक या चित्रपटाचे कौतुक करत असतानाच, काही लोक या चित्रपटाला 'प्रपोगंडा' (Propaganda) म्हणत आहेत. लोकांच्या या टीकेला आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
"टीका करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे"
अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, "जे लोक या चित्रपटाला प्रपोगंडा म्हणत आहेत, त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. सुरुवातीला मला राग यायचा, कारण त्यांनी 'द काश्मीर फाईल्स' आणि 'धुरंधर'च्या दोन्ही भागांना प्रपोगंडा म्हटले. पण अशा चित्रपटांना प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. जर तुम्हाला असे चित्रपट सहन होत नसतील, तर तुम्ही स्वतः चित्रपट बनवा. हा चित्रपट आधुनिक भारताचे वास्तव मांडणारा आहे."
आदित्य धर एक 'रॉकस्टार'
अनुपम खेर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी आदित्यला 'रॉकस्टार' असे संबोधले. खेर यांच्या मते, हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेच, याशिवाय हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिकरित्याही जोडून ठेवतो. "हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे. हा चित्रपट पाहायलाच पाहिजे आणि त्यावर चर्चाही झालीच पाहिजे," असेही त्यांनी नमूद केले.
संजय दत्तच्या अभिनयाची प्रशंसा
अनुपम खेर यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या संजय दत्तच्या कामाचेही कौतुक केले. त्यांनी लिहिले की, "संजय दत्तने या चित्रपटात जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे." या चित्रपटात रणवीर सिंगसोबतच आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या सोशल मीडियावर अनुपम खेर यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून, 'धुरंधर २' बद्दल सुरू असलेल्या वादावर त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया चर्चेत आहे.