"ते बरे होत होते, मला पाहून त्यांनी...", धर्मेंद्र यांच्या निधनाआधी अनिल शर्मांनी घेतलेली त्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:21 IST2025-11-27T15:21:04+5:302025-11-27T15:21:33+5:30
अनिल शर्मा हे देओल कुटुंबाचे निकटवर्तीय आहेत.

"ते बरे होत होते, मला पाहून त्यांनी...", धर्मेंद्र यांच्या निधनाआधी अनिल शर्मांनी घेतलेली त्यांची भेट
नेहमी हसतमुख राहणारे देखणे हिरो धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर अख्खी सिनेसृष्टी पोरकी झाली. धर्मेंद्र काही दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. तिथे त्यांना भेटण्यासाठी अनेक कलाकार येऊन गेले. 'गदर'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीही तेव्हा धर्मेंद्र यांच्या रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. त्या दिवशी धर्मेंद्र यांची प्रकृती कशी होती याचा त्यांनी खुलासा केला.
अनिल शर्मा हे देओल कुटुंबाचे निकटवर्तीय आहेत. विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत अनिल शर्मा म्हणाले, "मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मी त्यांच्या बाजूला बसलो तेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि हात दाखवून मी ठीक आहे असंही म्हणाले. डॉक्टरही हेच सांगत होते की धरमजी खूप स्ट्राँग आहेत."
ते पुढे म्हणाले,"डॉक्टरांनी आम्हाला विश्वास दिला होता की धरमजी लवकरच बरे होतील. तरी वाढत्या वयाचा परिणाम दिसतोच आणि त्यासमोर आपलं काहीही चालत नाही. ते ठीक होतील अशी सर्वांनाच आशा होती आणि ८ डिसेंबरला आम्ही त्यांचा वाढदिवसही साजरा करणार होता. सगळेच तयारी करत होते."
अनुल शर्मा यांनी १९८७ साली 'हुकूमत' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं ज्यामध्ये धर्मेंद्र होते. तेव्हापासूनची त्यांची मैत्री आहे. नंतर त्यांनी धर्मेंद्र आणि त्यांच्या दोन्ही मुलांसोबत बरेच सिनेमे केले. तसंच बाप-लेकांना घेऊन त्यांनी 'अपने' हा सिनेमा केला. 'अपने २'चीही त्यांनी घोषणा केली होती मात्र आता धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तो सिनेमा बंद झाला आहे.