अनिल कपूर सांगतोय, लग्नानंतर इतकी बदललीय माझी मुलगी सोनम कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 14:51 IST2019-11-21T14:48:18+5:302019-11-21T14:51:20+5:30
लग्न झाल्यानंतर सोनम खूप बदलली असल्याचे अनिल कपूरचे म्हणणे आहे.

अनिल कपूर सांगतोय, लग्नानंतर इतकी बदललीय माझी मुलगी सोनम कपूर
अनिल कपूरच्या मुलीचे म्हणजेच सोनमचे गेल्या वर्षी लग्न झाले असून ती सध्या लंडनमध्ये राहात आहे. ती केवळ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईत येते. लग्न झाल्यानंतर सोनम खूप बदलली असल्याचे अनिल कपूरचे म्हणणे आहे. तिच्यात कोणकोणते बदल झाले आहेत हे देखील त्याने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूरला सोनमबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने सांगितले की, या दिवाळीत आनंद आणि सोनम भारतात होते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी खूप चांगली पार्टी दिली होती. ही पार्टी रिया आणि सोनम या माझ्या मुलींनीच अरेंज्ड केली होती. ही पार्टी खूपच छान झाली होती. लग्नानंतर सोनम खूपच बदलली आहे. मुंबईत ती कधीच जेवण वगैरे बनवत नव्हती. पण आता लंडनमध्ये गेल्यावर तिने जेवण बनवायला सुरुवात केली आहे. तिने बनवलेले पदार्थ अद्याप तरी मी चाखलेले नाहीत. पण ती अतिशय चविष्ट जेवण बनवते असे मी ऐकले आहे.
सोनम कपूरचा झोया फॅक्टर काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. आज सोनमने बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. सावरिया या चित्रपटाद्वारे तिने तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिने दिल्ली 6, रांजना, खुबसुरत, प्रेम रतन धन पायो, नीरजा, पॅडमॅन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिचे लग्न गेल्यावर्षी आनंद आहुजा या व्यवसायिकासोबत झाले असून ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते. २०१४ मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती. त्या दोघांचे कॉमन फ्रेंड असलेले परनिया कुरैशीने त्या दोघांची पहिली भेट घडवून आणली होती. पहिल्या भेटीच्या महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले आणि इथून या गोड प्रेमकथेची सुरुवात झाली. मे २०१८ मध्ये दोघांनीही लग्न केले.