अमिताभ बच्चन दिसणार ह्या सीक्वलमध्ये, चित्रीकरणाला पुढील वर्षी सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 16:23 IST2018-12-08T16:20:26+5:302018-12-08T16:23:00+5:30
२००२ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'आँखे'चा सीक्वल येणार असून या चित्रपटाच्या शूटिंगला २०१९च्या मध्यात सुरूवात होणार आहे.

अमिताभ बच्चन दिसणार ह्या सीक्वलमध्ये, चित्रीकरणाला पुढील वर्षी सुरूवात
२००२ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'आँखे'चा सीक्वल येणार असून या चित्रपटाच्या शूटिंगला २०१९च्या मध्यात सुरूवात होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बझ्मी करणार आहेत. या चित्रपटाची कथा तीन अंध व्यक्तींभोवती फिरणार आहे. यात अमिताभ बच्चन असे अभिनेते आहेत जे 'आँखे'मध्ये होते आणि या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये देखील असणार आहेत.
तरूण अग्रवाल, सुनील लुल्लासोबत मिळून 'अाँखे २' चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याबाबत तरूण अग्रवाल म्हणाले की, 'अमिताभ बच्चन या सीक्वलमध्ये आहेत. बाकी युवा कलाकारांच्या आम्ही शोधात आहोत. सध्या काही कलाकारांशी बातचीत सुरू असून आता त्यांच्याबद्दल सांगणे उचित ठरणार नाही.'
गौरांग दोषी यांनी २००२मध्ये 'आँखे' चित्रपटाची निर्मिती केली होती व त्यांनी ऑगस्ट २०१६मध्ये 'आँखे २'ची घोषणा केली होती. त्यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनिल कपूर, अर्जुन रामपाल, अरशद वारसी यांच्या नावाचा समावेश होता. तर नायिकेमध्ये इलियाना डिक्रुझसोबत रेजीना कसान्ड्राची देखील वर्णी या सिनेमात लागली होती. मात्र याच दरम्यान तरूण व गौरांग यांच्यामध्ये 'आँखे २' वरून वाद सुरू झाला आणि ही लढाई कोर्टापर्यंत गेली.
याबाबत तरूण अग्रवालने चुप्पी साधली असून 'अाँखे २'च्या चित्रीकरणाबाबत सांगितले की,'मे-जुलै किंवा जून -ऑगस्टच्या दरम्यान या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करणार आहोत. लंडन व जॉर्जियामध्ये चित्रीकरण पार पडणार आहे. कथेत कॅसीनो असल्यामुळे ते जॉर्जियामध्ये आधीच बुक केले आहे. '
'आँखे'च्या सीक्वलमध्ये अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त कोण-कोण कलाकार पाहायला मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.