'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:19 IST2025-08-19T13:18:35+5:302025-08-19T13:19:16+5:30
'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे

'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा आगामी आणि बहुचर्चित 'रामायण' चित्रपट सतत चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाची आणि साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यात महानायक अमिताभ बच्चन यांच्या दुहेरी भूमिकेची चर्चा आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचे चाहते आणि 'रामायण' सिनेमाची वाट पाहणाऱ्यांना प्रेक्षकांना मोठं सरप्राईज मिळणार आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन 'रामायण' मध्ये जटायूच्या भूमिकेला आवाज देणार आहेत. जटायूचे पात्र व्हीएफएक्स (VFX) च्या मदतीने तयार केले जाईल आणि त्याला अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज दिला जाईल. यासाठी अमिताभ यांच्या डोळ्यांचे स्कॅनिंगही करण्यात आल्याचे सांगितले जाते, जेणेकरून या पौराणिक पात्राला अधिक प्रभावी बनवता येईल.
यासोबतच, निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांना आणखी एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी संपर्क साधला आहे. रिपोर्ट्सनुसार, ते 'रामायण' चित्रपटाचे सूत्रधार (निवेदक) म्हणूनही दिसू शकतात. त्यांची दमदार आवाजातील निवेदन शैली चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना रामायणाच्या अद्भुत जगात घेऊन जाईल, अशी निर्मात्यांना आशा आहे. याबाबत अजूनही निश्चितता नसली तरीही अमिताभ यांना जटायू आणि निवेदक या दुहेरी भूमिकेत पाहण्यात चाहते नक्कीच उत्सुक असतील, यात शंका नाही.
अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीही 'ब्रह्मास्त्र' सारख्या चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच निवेदकाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे, 'रामायण' मध्येही त्यांची दुहेरी भूमिका चित्रपटाची भव्यता नक्कीच वाढवेल. या चित्रपटात रणबीर आणि साई पल्लवी यांच्यासोबत यश रावणाची, सनी देओल हनुमानाची, तर लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारणार आहेत. 'रामायण' हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून, पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.