अयोध्येत बिग बींनी खरेदी केली नवी जमीन; वडिलांच्या आठवणीत करणार 'ही' खास गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:32 IST2025-03-11T16:30:42+5:302025-03-11T16:32:01+5:30
अयोध्येत अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा नवी प्रॉपर्टी खरेदी केलीय. या जागेवर ते वडिलांच्या आठवणीत खास गोष्ट करणार आहेत (amitabh bachchan)

अयोध्येत बिग बींनी खरेदी केली नवी जमीन; वडिलांच्या आठवणीत करणार 'ही' खास गोष्ट
प्रभू श्रीरामांचं भव्यदिव्य मंदिर असलेलं अयोध्या शहर (ayodhya) हे सध्या अनेकांसाठी तीर्थस्थान बनलं आहे. दररोज जगभरातून माणसं अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराला भेट देऊन रामललाचं दर्शन घेतात. अयोध्येमध्ये मंदिर स्थापनेपासूनच या जागेची सेलिब्रिटींनाही तितकीच भुरळ पडली आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी दिसली. अशातच अयोध्येमध्ये अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी पुन्हा एक जमीन खरेदी केली असून तिथे वडिलांच्या आठवणीत ते खास गोष्ट करणार आहेत.
बिग बी वडिलांंच्या आठवणीत करणार ही खास गोष्ट
गेल्या वर्षी २०२४ मध्ये आमिताभ यांनी अयोध्येत १४.५ कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती. आता त्यानंतर त्यांनी पुन्हा अयोध्येत जमिनीचा तुकडा खरेदी केलाय. ही नवी जमीन अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून फक्त १० किमी. अंतरावर आहे. अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या नावाने जो ट्रस्ट आहे त्या वतीने राजेश ऋषिकेश यादव यांनी हा जमिनीचा व्यवहार केलाय. तिहुरा मांझा भागात ५४ हजार स्क्वेअर फूट इतकं या जमिनीचं क्षेत्रफळ आहे.
अमिताभ यांच्या या नवीन जमिनीचा व्यवहार ८६ लाख रुपयांमध्ये झाला आहे. मीडिया रिपोर्ट्स अनुसार, अमिताभ यांनी ही जमीन त्यांचे वडील आणि प्रख्यात कवी हरिवंशराय बच्चन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खरेदी केलीय. बिग बी या जमिनीवर हरिवंशराय यांचं मेमोरिअल बनवण्यास उत्सुक आहेत. परंतु याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. असंही सांगण्यात येतं की, सामाजिक किंवा धार्मिक कार्यासाठी बिग बींच्या या नवीन जमिनीचा वापर करण्यात येईल.