'त्या' घाणेरड्या कमेंट्सवर खिलाडी कुमार अक्षय भडकला; म्हणाला, "सर्व भारतीयांना सांगू इच्छितो की"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:04 IST2026-02-20T11:00:07+5:302026-02-20T11:04:04+5:30
अक्षय कुमार सध्या त्याच्या 'व्हील ऑफ फॉर्च्यून' या टीव्ही गेम शोमुळे चर्चेत आहे.

'त्या' घाणेरड्या कमेंट्सवर खिलाडी कुमार अक्षय भडकला; म्हणाला, "सर्व भारतीयांना सांगू इच्छितो की"
Akshay Kumar on Northeast Indians : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या 'व्हील ऑफ फॉर्च्यून' या टीव्ही गेम शोमुळे चर्चेत आहे. मात्र, यावेळी चर्चा त्याच्या खेळाची नाही, तर त्याने वांशिक भेदभावाविरुद्ध (Racism) उचललेल्या आवाजाची होत आहे. ईशान्य भारतातील लोकांविरुद्ध होणाऱ्या असंवेदनशील आणि वर्णद्वेषी टिप्पण्यांबद्दल अक्षयने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
'व्हील ऑफ फॉर्च्यून' शोमध्ये ईशान्य भारतातील एका महिला स्पर्धकाने मुंबईत तिला आलेल्या भयावह अनुभवाबद्दल सांगितले. "कोविड-१९ च्या काळात माझ्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांमुळे लोक मला 'चीनला जा' असं म्हणायचे. माझ्यावर कोरोना पसरवल्याचा आरोप केला जायचा आणि माझी थट्टा उडवली जायची", असे सांगताना ती स्पर्धक भावुक झाली. तिची ही व्यथा ऐकून अक्षय कुमार कमालीचा अस्वस्थ झाला.
मेकअप आर्टिस्टला स्टेजवर बोलावून उघड केलं सत्य
केवळ सांत्वन न करता अक्षयने या समस्येचे गांभीर्य मांडण्यासाठी आपल्या 'किम' नावाच्या मेकअप आर्टिस्टला स्टेजवर बोलावले. किम ही मूळची मणिपूरची आहे. अक्षयने प्रेक्षकांना सांगितले की, किम अनेक वर्षांपासून त्याची काळजी घेते. यावेळी किमनेही तिला समाजात वावरताना 'चायनीज', 'चिंकी' आणि 'मोमो' यांसारख्या अपशब्दांचा सामना कसा करावा लागतो, हे उघड केले. हे ऐकून अक्षयला धक्काच बसला.
"ते माझ्या, तुमच्यासारखेच भारतीय"
अक्षय कुमार म्हणाला, "आज किमचे शब्द ऐकल्यानंतर माझी खात्री पटली आहे की हे सगळं खरंच घडतंय. मी सर्व भारतीयांना सांगू इच्छितो की, ईशान्येतील लोकांशी भेदभाव करणं थांबवा. ते माझ्यासारखे, तुमच्यासारखेच भारतीय आहेत. त्यांनी देशासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. नागा रेजिमेंट, कारगिल युद्ध, बांगलादेश युद्ध... या प्रत्येक वेळी त्यांनी आपलं रक्त सांडलं आहे. ते भारतीय आहेत, हे कायम लक्षात ठेवा". अक्षयने घेतलेल्या या भूमिकेचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत असून, ईशान्य भारतातील कलाकारांनी आणि नागरिकांनी त्याचे आभार मानले आहेत.