"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 10:54 IST2025-09-22T10:53:42+5:302025-09-22T10:54:53+5:30
पैशांबाबतीत लालची आहे 'खिलाडी कुमार'? म्हणाला...

"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
अभिनेता अक्षय कुमार वर्षाला चार-पाच सिनेमे करतो, भरपूर पैसे कमावतो असं नेहमीच त्याच्याबद्दल बोललं जातं. तसंच अनेक इव्हेंट्मध्येही हजेरी लावत तो पैसे चार्ज करतो. सर्वात जास्त टॅक्स भरणाराही अक्षयच आहे. या सगळ्या चर्चांवर आता अक्षयने उत्तर दिलं आहे. मी जे पैसे कमावतो ते चोरीचे नसतात तर मेहनतीचे असतात असं त्याने म्हटलं आहे.
अक्षय कुमार नुकताच 'आप की अदालत' या कार्यक्रमात आला होता. यावेळी अक्षयला त्याच्या कमाईबाबतीत प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, "माझ्याकडे जर पैसे आहेत तर मी ते कमावले आहेत चोरी केलेले नाहीत. मी काम करुन मेहनत करुन पैसे कमावले आहेत. ८ वर्षांपासून मी सर्वात जास्त टॅक्स भरणारा व्यक्ती आहे. त्यामुळे मी पैशांबाबतीत लालची आहे असं कोणी म्हणू शकत नाही. पैसा आयुष्यात महत्वाचा आहेच. याबाबतीत तुम्ही व्यावहारिक असलं पाहिजे."
तो पुढे म्हणाला,"पैसे कमवतो, टॅक्स भरतो, आणि त्या पैशातून सेवाही करतो. हा माझा धर्म आहे. कोणी काहीही म्हणो मी त्याकडे लक्ष देत नाही. जर कुठे रिबीन कट करुन पैसे मिळत असतील तर काय हरकत आहे? ते पैसे द्यायला तयार आहेत? जोपर्यंत तुम्ही चोरी करत नाही आहात लूट करत नाही आहात आणि मेहनत करत आहात तोवर काहीच अडचण नाही. एका सिनेमावेळी निर्मात्याला पैशांची अडचण आल्याने मी स्वत: त्यात पैसे घातले होते. मी पैशांबाबतीत लालची आहे असं कोणी म्हणत असेल तर मला फरक पडत नाही. "
अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी ३' नुकताच रिलीज झाला. यामध्ये अर्शद वारसी आणि तो एकत्र आले आहेत. पहिल्या दोन भागांच्या यशानंतर आता तिसरा भाग कसा परफॉर्म करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.