'धडकन' ते आजपर्यंत तीच केमिस्ट्री; अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:53 IST2026-03-27T13:30:45+5:302026-03-27T13:53:22+5:30
समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत.

'धडकन' ते आजपर्यंत तीच केमिस्ट्री; अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ चर्चेत
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी ही ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी. मोठ्या पडद्यावर सह-कलाकार म्हणून सुरुवात करणारे शिल्पा व अक्षय नंतर खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. शिल्पा व अक्षय लग्न करणार होते. पण अचानक दोघेही वेगळे झाले होते. त्यानंतर शिल्पाने राज कुंद्राशी लग्नगाठ बांधली, तर अक्षयने ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. पण, आता ९० च्या दशकातील ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल रात्री मुंबईत पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकार सहभाग झाले होते. या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.
अक्षय व शिल्पा यांनी 'मैं खिलाडी तू अनाड़ी' या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट ३१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर शिल्पाने कधीच अक्षय कुमारबरोबर काम करणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर हे दोघेही कधीच एकत्र स्क्रीनवर झळकले नाही. आता समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना, हसताना आणि मोकळेपणाने संवाद साधताना दिसले.
या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. "जणू आपण पुन्हा ९० च्या दशकात गेलोय", अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. तर काहींनी "दोघेही आजही एकत्र खूप छान दिसतात" असं म्हटलं आहे. अनेक चाहत्यांनी या जोडीने पुन्हा एकदा एकत्र चित्रपट करावा, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अक्षय आणि शिल्पा एकत्र दिसले. या वेळी त्यांनी त्यांच्या 'चुरा के दिल मेरा, गोरिया चली' या सुपरहिट गाण्यावर डान्स करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.