अक्षय कुमारने नाकारला होता OMG, नव्हती साकारायची कृष्णाची भूमिका, १३ वर्षांनंतर दिग्दर्शकाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:28 IST2025-09-17T12:28:07+5:302025-09-17T12:28:56+5:30
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षयने १३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'ओएमजी' चित्रपटात भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीला त्याने हा चित्रपट नाकारला होता. रुपेरी पडद्यावर देवाची भूमिका साकारायला तो तयार नव्हता. आता दिग्दर्शकाने यामागचं कारण सांगितलं आहे.

अक्षय कुमारने नाकारला होता OMG, नव्हती साकारायची कृष्णाची भूमिका, १३ वर्षांनंतर दिग्दर्शकाचा खुलासा
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय(Akshay Kumar)ने १३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'ओएमजी' चित्रपटात भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीला त्याने हा चित्रपट नाकारला होता. रुपेरी पडद्यावर देवाची भूमिका साकारायला तो तयार नव्हता. आता दिग्दर्शकाने यामागचं कारण सांगितलं आहे.
'ओएमजी'चे लेखक आणि दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, ''अक्षय कुमार सुरुवातीला भगवान कृष्णाची भूमिका साकारण्यासाठी तयार नव्हता. यामागे अमिताभ बच्चन कारणीभूत होते. पण नंतर तो या चित्रपटासाठी तयार झाला.'' उमेश शुक्ला 'ओएमजी'च्या निर्मितीबद्दल बोलत होते. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमारला चित्रपटासाठी तयार करताना काही आव्हानं आली का, असं विचारल्यावर ते म्हणाले, ''काही प्रमाणात त्याला तयार करणं कठीण होतं.''
अक्षयने चित्रपट का नाकारला होता?
ते म्हणाले, ''अक्षय कुमारने सुरुवातीला हा चित्रपट नाकारला होता, कारण अमिताभ बच्चन यांनी नुकतंच 'गॉड तुस्सी ग्रेट हो' नावाच्या चित्रपटात देवाची भूमिका केली होती.'' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. त्यामुळे अक्षयला वाटलं, 'जर अमिताभ बच्चन त्या भूमिकेत यशस्वी झाले नाहीत, तर मी देवाच्या भूमिकेत कसा विश्वसनीय दिसेन?'' त्यानंतर अक्षयला समजावून सांगितलं गेलं की, ''या चित्रपटातील देवाचं पात्र खूप वेगळं आहे. तो लॅपटॉप वापरतो, बाईक चालवतो, जे इतर चित्रपटांपेक्षा वेगळं आहे. त्यानंतर अक्षयने ते नाटक पाहिले, ज्यावर हा चित्रपट आधारित होता. हे नाटक पाहिल्यावर त्याने चित्रपटासाठी होकार दिला.''
'ओएमजी'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
'ओएमजी' चित्रपटात परेश रावल आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत ओम पुरी, गोविंद नामदेव, पूनम झावर, पूजा गुप्ता आणि महेश मांजरेकर यांसारखे अनेक कलाकार होते. हा चित्रपट २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता आणि त्याने जगभरात १४९ कोटी रुपयांची कमाई केली होती. २०२३ मध्ये 'ओएमजी २' प्रदर्शित झाला, ज्यात अक्षयसोबत पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत होते.