ठाकरेंचा सुपुत्र अभिनेता, गीतकार आणि संगीतकारही! 'निशांची'मधून ऐश्वर्य ठाकरेची दिसणार दुसरी बाजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:36 IST2025-09-08T15:35:27+5:302025-09-08T15:36:05+5:30
अनुराग कश्यप यांचा आगामी चित्रपट 'निशांची' मध्ये ऐश्वर्य ठाकरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून तो केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर गीतकार आणि संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आहे

ठाकरेंचा सुपुत्र अभिनेता, गीतकार आणि संगीतकारही! 'निशांची'मधून ऐश्वर्य ठाकरेची दिसणार दुसरी बाजू
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा आगामी चित्रपट 'निशांची' मध्ये ऐश्वर्य ठाकरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून तो केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर गीतकार आणि संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आहे. या सिनेमातील 'पिजन कबूतर' हे हटके गाणं नुकतंच झी म्युझिक कंपनीने रिलीज केलं आहे.
या गाण्याचे बोल आणि संगीत ऐश्वर्य ठाकरे याने स्वतः लिहिले आहे. त्याबरोबरच हे गाणं संगीतबद्धही केलं आहे. भूपेश सिंग यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. खास हिंग्लिश शैलीतील हे गाणं, त्याचे मजेशीर बोल आणि उर्जा भरलेल्या बीट्समुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हे गाणं सोशल मीडियावरही ट्रेंड होत आहे.
दरम्यान, 'निशांची' चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून तो मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री वेदिका पिंटो प्रमुख भूमिकेत दिसणार असून, मोनिका पनवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. 'निशांची' चित्रपटाचे संगीत अल्बम 15 गाण्यांनी सजलेलं आहे. त्यातील 'पिजन कबूतर' हे गाणं या एल्बममधील एक वेगळं आणि लक्ष वेधणारं गाणं आहे.
या गाण्याच्या निर्मितीचा अनुभव शेअर करताना ऐश्वर्य म्हणतो, “मी जेव्हा अभिनय करायला सुरुवात केली, तेव्हाच ठरवलं होतं की माझ्या पहिल्या चित्रपटात मी स्वतःचं गाणं आणायचं. एकदा रात्री 3 वाजले तरी मला झोप येत नव्हती. मी उठलो, कीबोर्ड आणि गिटार घेतला आणि 'निशांची'च्या कथेतली धमाल आणि नटखट उर्जा टिपण्यासाठी गाण्याची कल्पना रेकॉर्ड करायला सुरुवात केली. सकाळपर्यंत गाणं तयार झालं. मी अनुराग सरांना पाठवलं आणि त्यांनी पाच हार्ट इमोजीसह उत्तर दिलं की 'हे माझं आवडतं गाणं आहे. पूर्ण कर आणि पाठव". 'निशांची' हा अॅक्शन, ह्युमर आणि ड्रामाने भरलेला फुल मसाला एंटरटेनर चित्रपट येत्या 19 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.