ऐश्वर्या राय बच्चनला पडू लागलीत दिग्दर्शक बनण्याचे स्वप्नं!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 19:00 IST2018-08-03T17:21:30+5:302018-08-03T19:00:00+5:30
‘फन्ने खां’ या चित्रपटानंतर ऐश्वर्या नवे काय करणार, तिचा नवा प्रोजेक्ट काय असेल, हे जाणून घेण्यास मात्र चाहते उत्सूक आहेत.

ऐश्वर्या राय बच्चनला पडू लागलीत दिग्दर्शक बनण्याचे स्वप्नं!!
‘फन्ने खां’ या चित्रपटाद्वारे ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर परतली. आज हा चित्रपट चित्रपटगृहांत झळकला. आशा-आकांक्षा, स्वप्न आणि नात्यांभोवती गुंफलेली ‘फन्ने खां’ची कथा समीक्षकांना भावली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट किती भावतो, ते येत्या दिवसांत कळेलच. पण या चित्रपटानंतर ऐश्वर्या नवे काय करणार, तिचा नवा प्रोजेक्ट काय असेल, हे जाणून घेण्यास मात्र चाहते उत्सूक आहेत. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने हाच प्लान उघड केला. होय, त्यानुसार, सध्या ऐश्वर्या दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न पाहू लागली आहे. येत्या काही वर्षांत मी नक्की दिग्दर्शक बनलेली तुम्हाला दिसेल, असे ऐश्वर्या या मुलाखतीत म्हणाली. मला चित्रपट मेकींगमधले जरा जास्तचं कळते, असे म्हणून माझे दिग्दर्शक आणि माझे को-स्टार नेहमीच माझी मजा घेत असतात. पण ते खरे आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत मी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले तर तुम्हाला नवल वाटायला नको. माझा पती अभिषेक बच्चन यानेही मला दिग्दर्शनात हात आजमावण्याचा सल्ला दिला आहे. तो सतत मला यासाठी प्रोत्साहित करत असतो, असे ऐश्वर्या म्हणाली. आता ऐश्वर्याने इतके मनावर घेतले म्हटल्यावर, ती लवकरच दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसेल, यात शंका नाही. त्यामुळे आता केवळ ऐश्वर्या दिग्दर्शित चित्रपटाची प्रतीक्षा तेवढी करायची.
लवकरच ऐश्वर्या आणि अभिषेक पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'गुलाब जामून' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या निमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.लग्नाआधी या दोघांनी 'गुरु' सिनेमात एकत्र काम केले होते. मध्यंतरीच्या काळात ऐश्वर्या आणि अभिषेकने एकमेकांसोबत काम करण्यासाठी नकार दिल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता हे दोघे एका सिनेमात काम करणार असल्याचे नक्की झाले आहे.
अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या 'गुलाब जामून' सिनेमात अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी पाहायला मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. सर्वेश मेवाडा हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून दोन वर्षांपूर्वीच चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी काही कारणांमुळे ऐश्वर्या आणि अभिषेकने एकमेकांसोबत काम करायला नकार दिल्याची माहिती समोर आली होती.