'धुरंधर'ची यशाला गवसणी! रणवीर सिंगची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "वेळ आल्यावर नशीब..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:31 IST2025-12-15T15:25:57+5:302025-12-15T15:31:22+5:30
'धुरंधर' सिनेमाला जे जबरदस्त यश मिळालं त्यानंतर रणवीरने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाला रणवीर?

'धुरंधर'ची यशाला गवसणी! रणवीर सिंगची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "वेळ आल्यावर नशीब..."
अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचा स्पाय अॅक्शन चित्रपट 'धुरंधर' (Dhurandhar) बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने केवळ देशभरातच नाही, तर जगभरात विक्रमी कमाई करून अनेक सिनेमांचे जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चित्रपटाच्या या अभूतपूर्व यशानंतर रणवीर सिंग आनंदात असून, त्याने आपल्या भावना इंस्टाग्राम स्टोरीवर व्यक्त केल्या आहेत.
रणवीर सिंगची खास पोस्ट
'धुरंधर'च्या यशाने रणवीर सिंगच्या फिल्मी कारकीर्दीत पुन्हा एकदा सुपरहिट चित्रपटाचा समावेश झाला आहे. 'धुरंधर' चित्रपटाच्या दमदार प्रदर्शनामुळे रणवीर अत्यंत समाधानी आणि उत्साहात दिसत आहे. त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यातून त्याच्या मनातील भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. रणवीरने लिहिले की, "नशीबाची एक सुंदर सवय आहे की, वेळ येईल तशी ती बदलते. पण तूर्तात... पाहा आणि संयम ठेवा''
रणवीरच्या ही पोस्ट महत्त्वाची आहे. कारण 'धुरंधर'पूर्वी त्याच्या काही चित्रपटांना म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं, पण या चित्रपटाने त्याच्या करिअरला एक नवीन उंची दिली आहे. अनेक हिट चित्रपट देणाऱ्या रणवीरसाठी 'धुरंधर' हा त्याच्या कारकीर्दीतील एक माईलस्टोन चित्रपट ठरला आहे.
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा धमाका
जिओ स्टूजिओजने दिलेल्या आकडेवारीनुसार, 'धुरंधर'ने रिलीजच्या अवघ्या १० दिवसांत जगभरात ५५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये १४६.६० कोटी रुपयांहून अधिक कमाई करून एक नवीन इतिहास रचला आहे. दिग्दर्शक आदित्य धरने 'धुरंधर'ला एक वेगळी ट्रीटमेंट दिली आहे, ज्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप वेगळा वाटत आहे.
स्पाय फिल्म असूनही, यात पाकिस्तानचा डॉन आणि तिथले राजकारण ज्या पद्धतीने दाखवले आहे, त्याला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली आहे. चित्रपटात रणवीर सिंगसोबतच संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांसारख्या तगड्या कलाकारांची फळी आहे.