'बॉर्डर २'नंतर अहान शेट्टीला लागली लॉटरी, हॉरर सिनेमात झाली एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:10 IST2025-09-04T17:09:46+5:302025-09-04T17:10:29+5:30
Ahan Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टीच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा एक हॉरर चित्रपट असून त्याची कथा प्रसिद्ध चित्रपट निर्माते पॅट्रिक ग्रॅहम लिहिणार आहेत.

'बॉर्डर २'नंतर अहान शेट्टीला लागली लॉटरी, हॉरर सिनेमात झाली एन्ट्री
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांचा मुलगा अहान शेट्टी(Ahan Shetty)च्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा एक हॉरर चित्रपट असून त्याची कथा प्रसिद्ध चित्रपट निर्माते पॅट्रिक ग्रॅहम लिहिणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही आणि त्याच्या मुख्य अभिनेत्रीचा शोध देखील सुरू आहे. त्याची कथा वेगळी असेल, कारण याद्वारे पॅट्रिक ग्रॅहम हिंदी चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे.
यापूर्वी पॅट्रिक ग्रॅहमने 'घोल' आणि 'बेताल' सारख्या हॉरर मालिका बनवल्या होत्या. त्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्या होत्या आणि दोघांचीही कहाणी खूप गाजली होती. आता हा नवीन चित्रपट रोमँटिक तसेच हॉरर असेल, जो ऐतिहासिक घटनांशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. हा ख्याती मदनच्या नॉट आउट एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवला जाईल. अहान शेट्टीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने २०२१ मध्ये 'तडप' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा एक रोमँटिक अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकला नाही. सध्या तो 'बॉर्डर-२' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
'बॉर्डर २'बद्दल
अहानच्या आगामी 'बॉर्डर २' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे. हा चित्रपट २२ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शक अनुराग सिंग आहेत. 'बॉर्डर २' मध्ये सनी देओल, वरुण धवन, मेधा राणा, मोना सिंग आणि सोनम बाजवा सारखे कलाकार देखील आहेत. भूषण कुमार आणि जेपी दत्ता यांनी त्याची निर्मिती केली आहे.