'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 08:46 IST2026-04-05T08:44:25+5:302026-04-05T08:46:20+5:30
Dacoit trailer: काय आहे 'डकैत'ची कहाणी?

'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Dacoit trailer: अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या आगामी 'डकैत' सिनेमाचा ट्रेलर काल रिलीज झाला. सिनेमाच्या रिलीजच्या एक आठवडाआधी ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'धुरंधर'नंतर हाच सिनेमा कमाई करेल अशा प्रतिक्रिया येत आहेत. हा सिनेमा आधी १९ मार्च रोजी रिलीज होणार होता. मात्र 'धुरंधर २'सोबत क्लॅश होत असल्याने रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता 'डकैत' १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
'डकैत' सिनेमात मृणाल ठाकुरसोबत अदिवि शेष आणि अनुराग कश्यप आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच मृणाल आणि अदिवि या रोमँटिक कपलची ओळख होते. दोघांनाही लग्न करण्याची इच्छा असते. मात्र परिस्थिती अशी बनते की मृणाल अदिविचा विश्वासघात करते. काही कारणामुळे अदिविला तुरुंगवास होतो. त्याचं अर्ध आयुष्य जेलमध्येच जातं तेव्हा त्याच्या मनात मृणालविरुद्ध बदल्याची भावना निर्माण होते. एक दिवस संधी साधून अदिवि जेलमधून पळून जातो आणि मृणालला शोधायला निघतो. जेव्हा मृणाल त्याला सापडते तेव्हा त्याला कळतं की तिची एक छोटी मुलगी आहे. मृणाल मोठ्या अडचणीत सापडलेली असते आणि अदिवि तिची मदत करतो. मृणालला पैशांची गरज असते म्हणून दोघं चोरी करण्याची योजना आखतात. पण यात त्यांचा सामना खतरनाक पोलिस अधिकारी अनुराग कश्यपशी होतो. यानंतर काय घडतं याची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'डकैत'चा ट्रेलरला काही मिनिटांतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी कमेंट करत सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'धुरंधर नंतर मला आता हा सिनेमा पाहायचा आहे', 'अदिवि शेष भाई स्क्रीनवर आग लावेल', 'डकैत रेकॉर्ड बनवेल' अशा कमेंट्स आल्या आहेत.
'डकैत' मध्ये मृणाल ठाकुर, अदिवि शेष, अनुराग कश्यप यांच्यासह प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, कामाक्षी यांच्याही भूमिका आहे. शनेल देव यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.