"मी गोरी दिसावी म्हणून मेकअप लावला जायचा"; लोकप्रिय अभिनेत्रीने इतक्या वर्षांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 17:48 IST2026-03-08T17:47:33+5:302026-03-08T17:48:33+5:30
रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस दिसणाऱ्या अभिनेत्रींना पडद्यामागे कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, याबद्दल अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे.

"मी गोरी दिसावी म्हणून मेकअप लावला जायचा"; लोकप्रिय अभिनेत्रीने इतक्या वर्षांनी केला खुलासा
बॉलिवूडमध्ये एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या तिच्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत आली आहे. रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस दिसणाऱ्या अभिनेत्रींना पडद्यामागे कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, याबद्दल समीराने धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समीराने बॉलिवूडमधील सौंदर्याची व्याख्या नेमकी काय, यावर बोट ठेवलं आहे.
मिड डेला दिलेल्या मुलाखतीत समीरा रेड्डी म्हणाली, अभिनेत्रींना पडद्यावर सुंदर दिसण्यासाठी प्रचंड मानसिक दबाव टाकला जात असे. ती म्हणाली, "मी गोरी नाहीये त्यामुळे मला गोरं व्हावं लागेल असं अभिनेत्री म्हणून मला सुरुवातीला वाटायचं. त्यामुळे अनेक विचित्र कारणांनी मी गोरी दिसावी म्हणून माझ्यावर मेकअप लावला जायचा. मला स्वतःला आरशात पाहतानाही भीती वाटायची, कारण मी जी दिसत होती ती नैसर्गिक नव्हती. केवळ प्रेक्षकांना आवडेल अशा सौंदर्याची व्याख्या पूर्ण करण्यासाठी हे सर्व करावं लागायचं," अशा शब्दांत तिने आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
मेकअपशिवाय समीराला तिच्या वजनावरून आणि शरीरावरूनही अनेकदा टोमणे ऐकावे लागले होते. या सर्व गोष्टींमुळे तिच्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम झाला होता. मात्र, चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्यानंतर आता समीरा 'बॉडी पॉझिटिव्हिटी'चा प्रसार करत आहे. ती सोशल मीडियावर तिचे नैसर्गिक फोटो शेअर करत असते. यात तिचं वजन वाढलेलं दिसत असलंं किंवा केस पांढरे झाले असले तरीही समीरा ते लपवत नाही.
समीरा म्हणाली की, आजच्या अभिनेत्रींनी आणि तरुणींनी सौंदर्याच्या या कृत्रिम व्याख्येला बळी पडू नये. प्रत्येक व्यक्ती ही जशी आहे तशीच सुंदर असते, हे मान्य करणे आवश्यक आहे. समीराच्या या विधानामुळे बॉलिवूडमध्ये आजही सौंदर्याच्या नावाखाली कलाकारांवर कशा प्रकारे दबाव टाकला जातो, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. समीराच्या या धाडसी भूमिकेला अनेक महिलांनी पाठिंबा दर्शवला आहे.