"रश्मिकाला मराठी टोन जमला नाही...", अभिनेत्री सई देवधर 'छावा'बद्दल स्पष्टच बोलली
By ऋचा वझे | Updated: March 12, 2025 17:47 IST2025-03-12T17:46:21+5:302025-03-12T17:47:06+5:30
इतर भाषिक कलाकारांना मराठी भूमिका... मराठमोळ्या अभिनेत्रीने मांडल्या भावना

"रश्मिकाला मराठी टोन जमला नाही...", अभिनेत्री सई देवधर 'छावा'बद्दल स्पष्टच बोलली
'छावा' सिनेमाची चर्चा थांबता थांबत नाहीए. १४ फेब्रुवारी रिलीज झालेला सिनेमा अजूनही थिएटरमध्ये तुफान सुरु आहे. सिनेमा कमाईत आतापर्यंत ५०० कोटी पार गेला आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत शोभून दिसला आहे. तर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) या साऊथ अभिनेत्रीने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्रीला मराठी भूमिकेत का घेतलं असा अनेकांनी प्रश्न विचारला. नुकतंच मराठमोळी अभिनेत्री सई देवधरनेही (Sai Deodhar) यावर भाष्य केलं आहे.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सई देवधर म्हणाली, "मी प्रामाणिकपणे सांगते तिचा परफॉर्मन्स खूप सुंदर होता. पण तिच्या भाषेत एक दाक्षिणात्य लहेजा होता. इतिहास आपल्याला माहितच आहे की राणी येसूबाईंचं दाक्षिणात्य भागाशी काहीच कनेक्शन नव्हतं. मला वाटलं की जर डबिंग केलं असतं किंवा रश्मिकाने थोडा मराठी टोन पकडला असता तर तिला इतकं ट्रोल केलं गेलं नसतं. पण ती सिनेमात खूप सुंदर दिसली आहे हे मात्र खरं आहे."
ती पुढे म्हणाली, " रणवीर सिंहने बाजीराव मस्तानी मध्ये त्याच्या भूमिकेत तो मराठी लहेजा बरोबर आणला होता. रश्मिकाला ते जमलं नाही. पण म्हणून तशा भूमिका इतर भाषिक कलाकारांना द्यायच्याच नाहीत असं मी म्हणत नाही. फक्त कलाकाराने जी भूमिका साकारत आहोत त्या भूमिकेच्या भाषेचा टोन पकडलाच पाहिजे. रश्मिकाला मराठी भूमिका दिली हे मला अजिबातच खटकलेलं नाही."
सई देवधरने 'दबंगी-मुलगी आई रे आई','सारा आकाश' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने 'लपंडाव','मोगरा फुलला' या मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे.