'धुरंधर'चा सीक्वेलही येणार? अभिनेत्यानेच केलं कन्फर्म; म्हणाले, "दुसऱ्या भागातली भूमिका जास्त..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:42 IST2025-12-04T13:41:20+5:302025-12-04T13:42:07+5:30
'धुरंधर' साडेतीन तासांचा सिनेमा असून रिलीजआधीच आता याच्या सीक्वेलचीही चर्चा आहे.

'धुरंधर'चा सीक्वेलही येणार? अभिनेत्यानेच केलं कन्फर्म; म्हणाले, "दुसऱ्या भागातली भूमिका जास्त..."
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमा उद्या ५ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. सिनेमात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट आहे. तसंच अभिनेते राकेश बेदी यांचीही भूमिका आहे. जमील ही त्यांची व्यक्तिरेखा आहे. 'धुरंधर' साडेतीन तासांचा सिनेमा असून आता याच्या सीक्वेलचीही चर्चा आहे. नुकतंच अभिनेते राकेश बेदी यांनीही हे कन्फर्म केलं आहे.
'धुरंधर'चा दुसरा पार्टही येणार? यावर राकेश बेदी म्हणाले, "हो, हे खरं आहे. मी सुद्धा याबद्दल ऐकलं आहे. कारण माझं या सिनेमात अर्धच काम झालं आहे. जितकं काम केलंय ते तुम्हाला अर्धच दिसणार आहे. बाकी अर्धे काम दुसऱ्या भागात बघायला मिळेल. तसंच आतापेक्षा नंतरच्या भागातील माझं काम जास्त इंटरेस्टिंग आहे."
'धुरंधर'बद्दल सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडली त्यावर ते म्हणाले, "मला दिग्दर्शकाचं काम सर्वात जास्त आवडलं. साहजिकच तो माझा आवडता दिग्दर्शक आहे. मी त्याच्यासोबत उरी मध्येही काम केलं होतं. मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. तसंच तो माझ्याप्रति जे प्रेम आणि सम्मान दाखवतो ते पाहून खरोखरंच मी भारावून जातो. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला जाणीव झाली की मी बऱ्याच काळापासून असं काम केलेलंच नाही."
'धुरंधर' हा स्पाई-थ्रिलर ॲक्शन चित्रपट आहे. कथा मोठी आणि विस्तृत असल्याने, चित्रपटाची लांबी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. निर्मात्यांना विश्वास आहे की 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' आणि 'आर्टिकल ३७०' सारख्या चित्रपटांप्रमाणे 'धुरंधर'ची कथा देखील प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.