बॉलिवूड अभिनेता बेपत्ता होऊन झाली 30 वर्ष! अजूनही कुटुंबाकडून शोध सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 18:33 IST2024-04-13T18:32:21+5:302024-04-13T18:33:20+5:30
ऋषी कपूर यांच्या सुपरहिट 'कर्ज' सिनेमात त्याची भूमिका होती.

बॉलिवूड अभिनेता बेपत्ता होऊन झाली 30 वर्ष! अजूनही कुटुंबाकडून शोध सुरुच
बॉलिवूडचा असा एक अभिनेता जो तब्बल ३० वर्षांपासून बेपत्ता आहे. फोटोवरुन तुम्ही ओळखलंच असेल. ऋषी कपूर यांच्या सुपरहिट 'कर्ज' सिनेमात या अभिनेत्याला बघितलं असेल. शिवाय 'अर्थ', 'वारिस' अशा काही महत्वाच्या सिनेमांमध्येही तो झळकला. मात्र नंतर अचानक अभिनेता गायबच झाला आणि त्याचा पत्ताच कोणाला लागला नाही. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
70 च्या दशकातला स्टार अभिनेता राजकिरण महतानी (Rajkiran Mahtani). त्याने अनेक सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीसही पडला होता. ऋषी कपूर, शबाना आजमी, दीप्ती नवल अशा अनेक दिग्गजांसोबत त्याने काम केलं. मात्र 90 च्या दशकात हा अभिनेता एकाएकी गायबच झाला. 1994 नंतर राजकिरण बेपत्ता असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.गेल्या ३० वर्षांपासून राजकिरणचं कुटुंब त्याची वाट पाहत आहे. तो जीवंत आहे की नाही हेही आता कोणालाच माहित नाही. मात्र त्याची मुलगी रिशिका महतानी आजही त्याचा शोध घेत आहे.
रिशिका महतानी ज्वेलरी डिझायनर आणि ब्लॉगर आहे. ती एका स्टार अभिनेत्याची मुलगी असली तरी लाईमलाईपासून दूरच आहे. 2011 साली ऋषी कपूर यांना राजकिरण अटलांटामध्ये वेड्यांच्या दवाखान्यात असल्याची माहिती मिळाली. तेव्हा रिशिकाने समोर येत हे खोटं असल्याचं स्पष्ट केलं. वडिलांचा अजूनही पत्ता लागलेला नाही असं तिने सांगितलं. तर दीप्ती नवल यांनी अमेरिकेत राजकिरणला टॅक्सी चालवताना पाहिलं होतं अशीही चर्चा झाली. मात्र काय खरं काय खोटं हे आजपर्यंत समोर आलंच नाही.