आता मजा येणार! अक्षय-सैफच्या 'हैवान'मध्ये 'या' साऊथ सुपरस्टारची एन्ट्री, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:28 IST2025-11-15T11:25:59+5:302025-11-15T11:28:21+5:30
अक्षय कुमार, सैफ अली खानच्या आगामी 'हैवान' सिनेमात साऊथ सुपरस्टारची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे

आता मजा येणार! अक्षय-सैफच्या 'हैवान'मध्ये 'या' साऊथ सुपरस्टारची एन्ट्री, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या आगामी 'हैवान' (Haiwaan) या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे मुख्य भूमिकेत आहेत. आता या मल्टी-स्टारर प्रोजेक्टमध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार काम करणार असल्याने चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोण आहे हा साऊथ सुपरस्टार?
दिग्दर्शक प्रियदर्शनने केलं खास स्वागत
प्रियदर्शन यांच्या 'हैवान' चित्रपटात साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची एन्ट्री झाली आहे. मोहनलाल यांनी 'हैवान'च्या शूटिंगला सुरुवात केली असून, याबद्दलची माहिती खुद्द दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सोशल मीडियावर दिली आहे. प्रियदर्शन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सैफ अली खान आणि मोहनलाल यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्यांच्यासोबत एक लहान मुलगीही दिसत आहे.
या फोटोला कॅप्शन देताना प्रियदर्शन यांनी एक भावनिक नोट लिहिली. ते लिहितात, "आयुष्य कसं बदलतं ते पहा. मी इथे 'हैवान'च्या शूटिंग सेटवर आहे, माझ्या सर्वात मोठ्या क्रिकेट नायकांच्या (मन्सूर अली खान पतौडी) मुलासोबत (सैफ अली खान) आणि माझ्या आवडत्या चित्रपट अभिनेत्यासोबत (मोहनलाल) काम करत आहे. खरंच, देव खूप दयाळू आहे." अशाप्रकारे भावुक कॅप्शन देत प्रियदर्शन यांनी मोहनलाल यांचं चित्रपटाच्या सेटवर स्वागत केलंय.
कॅमिओ भूमिकेची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, मोहनलाल या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत. 'हैवान'मध्ये सैफ अली खान एका अंध व्यक्तीची भूमिका साकारत आहे, तर अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत आहे. प्रियदर्शन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मोहनलाल आणि सैफ अली खान दोघेही काळ्या रंगाचे चष्मे आणि हातात काठी घेऊन दिसत आहेत. यामुळे मोहनलाल देखील चित्रपटात एका अंध व्यक्तीची भूमिका साकारत असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मोहनलाल यांचे आगामी प्रोजेक्ट्स
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, मोहनलाल यांचे या वर्षात 'एल २ एम्पुरान', 'थुडारम' आणि 'हृदयपूर्वम' असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या व्यतिरिक्त, त्यांची पॅन इंडिया अॅक्शन थ्रिलर 'वृषभ' २५ डिसेंबर रोजी रिलीजसाठी सज्ज आहे. आता 'हैवान'मधील त्यांच्या एन्ट्रीमुळे बॉलिवूड आणि साऊथच्या चाहत्यांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार यात शंका नाही