अजय देवगणच्या 'रेड 2' ची रिलीज डेट पुढे ढकलली, समोर आलं महत्त्वाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 15:44 IST2024-08-11T15:43:12+5:302024-08-11T15:44:21+5:30
अजय देवगणच्या 'Raid 2' सिनेमाबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे.

अजय देवगणच्या 'रेड 2' ची रिलीज डेट पुढे ढकलली, समोर आलं महत्त्वाचं कारण
सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि हिट चित्रपटांमुळे ओळखला जातो. अजय देवगणच्या 'Raid 2' सिनेमाबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'Raid' या सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. 'Raid' सिनेमानंतर आता 'Raid 2'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला 'Raid 2' सिनेमा 15 नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण, रोहित शेट्टी दिग्दर्शित अजयच्याच 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर 'Raid 2' च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाला आहे. 'सिंघम अगेन' हा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, तो आता दिवाळीच्या आसपास १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'Raid 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढील वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आली आहे.
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'Raid 2'या चित्रपटाची निर्मिती टी-सिरीजतर्फे करण्यात आली आहे. तर, या चित्रपटात अभिनेता अजय देवगणसह अभिनेत्री वाणी कपूर आणि खलनायकाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे. रितेशने याआधीही काही सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'एक व्हिलन' आणि 'मरजावा' या चित्रपटांत रितेश निगेटिव्ह रोलमध्ये दिसला होता. त्याच्या या भूमिकांनाही चाहत्यांनी पसंती दर्शविली होती. आता पुन्हा एकदा रितेश खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.