जयपूर विमानतळावर रणधीर कपूर दिसले व्हिलचेअरवर, अभिषेक बच्चन घेत होता त्यांची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:33 IST2019-10-04T13:31:51+5:302019-10-04T13:33:04+5:30
अभिषेक आणि करिश्मा यांचा साखपुडा मोडल्यानंतरही त्यांच्या दोघांचे एकमेकांच्या कुटुंबियांसोबत आजही खूपच चांगले संबंध आहेत आणि हीच गोष्ट नुकतीच पाहायला देखील मिळाली.

जयपूर विमानतळावर रणधीर कपूर दिसले व्हिलचेअरवर, अभिषेक बच्चन घेत होता त्यांची काळजी
नव्वदीच्या दशकात करिश्मा कपूर आणि अजय देवगण यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर काहीच वर्षांत तिचा अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा झाला. बच्चन कुटुंबियांसोबत ती अनेक सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असे. त्यामुळे आता अभिषेक आणि तिचे लवकरच लग्न होईल असे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांचा साखरपुडा मोडला.
अभिषेक आणि करिश्मा यांचा साखपुडा मोडल्यानंतरही त्यांच्या दोघांचे एकमेकांच्या कुटुंबियांसोबत आजही खूपच चांगले संबंध आहेत आणि हीच गोष्ट नुकतीच पाहायला देखील मिळाली. जे. पी. दत्ता यांचा नुकताच वाढदिवस झाला. हा वाढदिवस धुमधडाक्यात जयपूरला साजरा करण्यात आला. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेकांनी जयपूरला हजेरी लावली होती. अभिषेक बच्चन आणि रणधीर कपूर दोघे देखील जे. पी. दत्ता यांच्या वाढदिवसासाठी खास जयपूरला गेले होते. त्या दोघांना यावेळी जयपूर विमानतळावर पाहाण्यात आले. पण विमानतळाच्या बाहेर पडताना रणधीर कपूर हे व्हीलचेअरवर बसले होते. ते त्यांच्या गाडीपर्यंत व्यवस्थित पोहोचावेत याची काळजी अभिषेक बच्चन घेताना दिसला.
अभिषेक आणि करिश्माचे नाते तुटल्यानंतर काही वर्षांनी अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत लग्न केले तर करिश्मा कपूरने संजय कपूर या व्यवसायिकासोबत लग्न केले. पण दोन मुलांच्या जन्मानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला. आज करिश्मा एकटीच तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.
करिश्मा आणि अभिषेकने 'हा... मैंने भी प्यार किया' या चित्रपटात एकत्र काम केले होते. करिश्मा आणि अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. अभिषेक आणि करिश्मा यांच्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टीला आता अनेक वर्षं झाले आहेत. ते दोघे आपआपल्या आयुष्यात स्थिरावले देखील आहेत.