अभिषेक बच्चनच्या जवळच्या व्यक्तीचं निधन; भावुक पोस्ट लिहून म्हणाला- "त्यांचा आशीर्वाद घेऊन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:18 IST2025-11-10T13:16:02+5:302025-11-10T13:18:45+5:30
अभिषेक बच्चन सोशल मीडियावर पोस्ट करुन भावुक झाला आहे. गेली अनेक वर्ष त्याच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीचं निधन झालं आहे

अभिषेक बच्चनच्या जवळच्या व्यक्तीचं निधन; भावुक पोस्ट लिहून म्हणाला- "त्यांचा आशीर्वाद घेऊन..."
अभिषेक बच्चन हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. अभिषेक बच्चनने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक दुःखद बातमी शेअर केली. अभिषेकचे मेकअप आर्टिस्ट अशोक सावंत यांंचं निधन झालं. अभिषेकने सोशल मीडियावर भावुक पोस्ट करुन लिहिलं की, ''अशोक दादा आणि मी तब्बल २७ वर्षांहून अधिक काळ एकत्र काम केले आहे. माझ्या पहिल्या चित्रपटापासून त्यांनी माझा मेकअप केला.''
''ते केवळ माझ्या टीमचा भाग नव्हते, तर ते माझ्या कुटुंबातील एक सदस्य होते. त्यांचे मोठे बंधू दीपक, हे गेल्या ५० वर्षांपासून माझ्या वडिलांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते नेहमी माझ्यासोबत सेटवर येऊ शकत नव्हते. पण जेव्हा जेव्हा माझं शूटिंग असायचं, तेव्हा एकही दिवस असा नसायचा की त्यांनी माझी विचारपूस केली नसेल. माझा मेकअप व्यवस्थित केला जात आहे की नाही, हे ते त्यांच्या असिस्टंटकडून आवर्जून तपासून घ्यायचे.''
''ते अतिशय प्रेमळ, सज्जन आणि मनमिळाऊ व्यक्ती होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, एक उबदार मिठी देण्यासाठी ते नेहमी तयार असायचे. त्यांच्या बॅगेत नेहमी काहीतरी खास चिवडा किंवा बाकरवडी असायची. काल रात्री त्यांचं निधन झालं. एखाद्या नवीन चित्रपटाचा पहिला शॉट देण्यापूर्वी, मी ज्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचो, ती पहिली व्यक्ती ते होते. आता यापुढे मला स्वर्गाकडे पाहावे लागेल आणि हे माहीत असेल की तुम्ही तिथून मला आशीर्वाद देत आहात.''
''तुमचे प्रेम, तुमची काळजी, तुमचा सन्मान, तुमची कला आणि तुमच्या सदाबदार हास्यासाठी धन्यवाद दादा. यापुढे कामावर जाताना आता तुम्ही माझ्यासोबत नसणार हे जाणवणं, खूप हृदयद्रावक आहे. तुम्हाला शांती लाभो ही माझी प्रार्थना आहे आणि जेव्हा आपण पुन्हा भेटू, तेव्हा त्या उबदार मिठीची मी वाट पाहत आहे.'', अशा शब्दात अभिषेकने मेकअप दादा अशोक सावंत यांच्यासाठी भावुक पोस्ट लिहिली आहे.