ब्रेकवर असलेला Aamir Khan राजकुमार संतोषींच्या सिनेमातून करणार कमबॅक, दिग्दर्शक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 17:20 IST2023-01-21T17:19:39+5:302023-01-21T17:20:09+5:30
Aamir Khan : आमिर खान मागील वर्षी लाल सिंग चड्ढा सिनेमात झळकला होता. त्यानंतर त्याने करिअरमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.

ब्रेकवर असलेला Aamir Khan राजकुमार संतोषींच्या सिनेमातून करणार कमबॅक, दिग्दर्शक म्हणाले...
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांनी नेहमीच आपल्या सिनेमातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच गांधी-गोडसे एक युद्ध हा सिनेमा घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाची झलक पाहायला मिळाली होती. या सिनेमात मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी सध्या चर्चेत आले आहेत. नुकतेच त्यांनी आमिर खान(Aamir Khan)बद्दल भाष्य केले आहे, जे चर्चेत आले आहे.
आमिर खान मागील वर्षी लाल सिंग चड्ढा सिनेमात झळकला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. त्यानंतर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनमिस्टने करिअरमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबाला वेळ देता आला नाही म्हणून त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आता आमिर खानचे कमबॅक करण्यासाठी राजकुमार संतोषी सज्ज झाले आहेत.
नुकत्याच एका मुलाखतीत राजकुमार संतोषी म्हणाले की, माझ्याकडे सिनेमाचा विषय आहे. लाल सिंग चड्ढाच्या वेळी आमची भेट होणार होती, पण त्यानंतर त्याने सिनेइंडस्ट्रीतून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. पण एखाद्या दिवशी भेटलो तर मी त्याला गोष्ट सांगेन आणि त्याचा ब्रेक लवकर संपवण्याचा प्रयत्न करेन.
आमिर खानने राजकुमार संतोषी यांच्या अंदाज अपना अपना या सिनेमात काम केले होते. हा सिनेमा क्लासिक म्हणून ओळखला जातो. यात आमिरसोबत सलमान खानदेखील होता. हा सिनेमा आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात.