दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 14:54 IST2025-06-15T14:54:06+5:302025-06-15T14:54:46+5:30

आमिर खानने दिलं लांबलचक स्पष्टीकरण

aamir khan reacts on hindu wives and muslim names of kids reason behind it | दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...

दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...

अभिनेता आमिर खान(Aamir Khan)  त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आमिरची दोन लग्न झाली आणि घटस्फोट झाला. त्याला पहिली पत्नी रीना दत्तापासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आयरा (Ira) आणि जुनैद (Junaid) अशी त्यांची नावं आहेत. तर दुसरी पत्नी किरण रावपासून त्याला आझाद (Azaad) हा मुलगा आहे. आमिरच्या दोन्ही पत्नी हिंदू आहेत. तसंच त्याची आताची गर्लफ्रेंड गौरीही हिंदूच आहे. मग आमिरने मुलांची नाव मुस्लिमच का ठेवली? यावर नुकतंच त्याने उत्तर दिलं.

'आप की अदालत' कार्यक्रमात आमिर खान सहभागी झाला होता. यावेळी त्याला दोन्ही पत्नी हिंदू असूनही मुलांची नावं मुस्लिमच का ठेवली असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत तो म्हणाला, "माझ्या मुलांची नावं माझ्या पत्नींनीच ठेवली आहेत. यात माझा काहीच हस्तक्षेप नव्हता. नवऱ्याचं तसंही चालत नाही. बायकोच सगळं ठरवत असते. जुनैद आणि आयरा ही नावं रीनानेच ठेवली. मला हेही सांगायचंय की आयरा हे सरस्वतीचंच दुसरं नाव आहे. इरावती नाव ऐकलंच असेल. तर इरा हे त्याचं शॉर्टफॉर्म आहे. रीनाला याचा उच्चार आयरा हवा होता म्हणून मुलीचं नाव आयरा आहे. मेनका गांधींच्या 'बुक ऑफ हिंदू नेम्स' या पुस्तकात इरा हे नाव आहे. तिथून आयराचं नाव आलं."

तो पुढे म्हणाला, "त्यानंतर किरणने आमच्या मुलाचं नाव आजाद ठेवलं. याचं कारण आम्ही मौलाना आजाद यांच्या कुटुंबातून येतो. त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं. नेहरु, गांधी, पटेल यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. म्हणून किरण म्हणाली की आपल्या मुलाचं नाव त्यांच्यावरुन ठेवूया. तसंच आजाद हे मुसलमान नाव नाही. चंद्रशेखर आजाद माहितच आहेत. ते सुद्धा स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे आजाद या नावाचा कोणता धर्म नाही. हे तटस्थ नाव आहे."

आमिर खान आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत आहे. जिनिलिया डिसुजा मुख्य अभिनेत्री आहे. २० जून रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: aamir khan reacts on hindu wives and muslim names of kids reason behind it