Laal Singh Chaddha Review: कसा आहे आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा'? बघावा की नाही वाचा रिव्ह्यू...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 03:01 PM2022-08-11T15:01:30+5:302022-08-11T16:02:08+5:30

Laal Singh Chaddha : गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Aamir khan and kareena Kapoor starrer Laal Singh Chaddha Review | Laal Singh Chaddha Review: कसा आहे आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा'? बघावा की नाही वाचा रिव्ह्यू...

Laal Singh Chaddha Review: कसा आहे आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा'? बघावा की नाही वाचा रिव्ह्यू...

googlenewsNext

कलाकार : आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य, मोना सिंह, मानव विज, अहमद उमर, आर्या शर्मा
निर्देशक : अद्वैत चंदन
निर्माता : आमिर खान, किरण खान, ज्योती देशपांडे, अजित अंधारे
शैली : कॅामेडी ड्रामा
कालावधी : दोन तास ४४ मिनिटे
स्टार : अडीच स्टार 
चित्रपट परीक्षण : संजय घावरे 

ऑस्कर विजेत्या 'फॅारेस्ट गम्प' या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचं लेखन मराठमोळा अभिनेता-लेखक अतुल कुलकर्णीनं केलं आहे. हिंदीत चित्रपट बनवताना भारतीय प्रेक्षकांच्या मनातील संवेदनांचा समावेश अतुलनं केल्यानं पूर्णत: भारतीय चित्रपट पहात असल्याचा फील येतो. या चित्रपटात वेगळा आमिर दिसत असला तरी काही ठिकाणी पूर्वी पाहिलेल्या आमिरची झलकही दिसते. दिग्दर्शन जरी अद्वैत चंदन यांनी केलं असलं तरी चित्रपट आमिर खान प्रोडक्शनमध्ये बनला असल्यानं चित्रपटावर आमिरचाही ठसा उमटल्याचं जाणवत रहातं.

कथानक : एक पीस उडत उडत ट्रेनमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या पायापाशी येऊन पडतं. तो ते उचलतो आणि डायरीत ठेवतो आणि इथूनच सुरू होते लाल सिंह चढ्ढाची कहाणी... बालपणापासूनची आपली कथा लाल सांगू लागतो. बुद्धीनं कमी असलेला आणि पायांमध्येही बळ नसलेला लाल केवळ आईनं दिलेल्या शाब्दिक बळांमुळं पायांवर उभा रहातो. बालपणीच त्याच्या जीवनात रुपा नावाची मैत्रीण येते, पण तिची स्वप्नं खूप वेगळी असतात. लालचं स्वप्न म्हणजे आईनं सांगितलेलं ऐकणं. यासाठी आजोबा-पणजोबांप्रमाणे तो सैन्यात भर्तीही होतो. तिथे एकीकडे त्याला जीवाभावाचा मित्र बाला भेटतो, तर दुसरीकडे शत्रू बनून आलेला क्रूरकर्मा मोहम्मदही भेटतो. या दोघांसाठी लाल काय करतो, रुपाचं काय होतं आणि बुद्धू असूनही लाल कशा प्रकारे सर्वांसाठी हिरो बनतो त्याची कहाणी यात आहे.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपट कुठेही इंग्रजीचा रिमेक केल्याचं जाणवणार नाही याची काळजी लेखन पातळीवर घेण्यात आली असून खुमासदार विनोदांची पेरणीही करण्यात आली आहे. 'सिक्रेट सुपरस्टार'मुळे नावारूपाला आलेल्या अद्वैत चंदन यांनी अनामिक दबावाखाली काम केल्याचं सिनेमा पाहताना जाणवत रहातं.

आठवणींच्या माध्यमातून उलगडणारी पटकथा उत्सुकता वाढवणारी असली तरी लांबी जास्त झाल्यानं कंटाळा येतो. प्रत्येक वाक्याला हुंकार भरणारा, आईनं घडवलेला असल्यानं बऱ्याचदा 'मम्मी कहती थी की', असं म्हणणारा, बुद्धू असला तरी शत्रूचंही मन जिंकणारा लाल यात आहे. आईच्या शिकवणीमुळं अपंग असूनही 'नहीं तो मै तो बिलकुल चंगा हूं', असं म्हणत दुर्मम्य इच्छाशक्तीच्या बळावर अपंगत्वार मात करतो. नॅार्मल मुलांपेक्षा कमी बुद्धिमत्ता असूनही 'कोणापेक्षा कमी नाहीस तू, इतर मुलांसारखाच आहेस', या आईच्या विश्वास ठेवून स्वत:ला तसूभरही कमी न मानणारा आणि जीवनात चमत्कार होतात यावर विश्वास ठेवणारा लाल खूपच निरागस आहे. आणीबाणीच्या काळापासून सुरू झालेली कथा ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधींची हत्या, दिल्लीतील दंगल, बाबरी विध्वंस, लाल कृष्ण आडवाणींची रथयात्रा, मुंबईतील बॅाम्बस्फोट, अबू सलेम आणि मोनिका बेदी यांची प्रेम कहाणी आणि अबकी बार मोदी सरकार असा नारा देत चित्रपट आजच्या काळात पोहोचतो. आणीबाणी आणि क्रिकेट विश्वकप विजय या काळात लाल मात्र मोठा होत नाही. कला दिग्दर्शन बारकाईनं करण्याची आणि संकलनात काही दृश्यांना कात्री लावण्याची गरज होती. गाणी चांगली आहेत. पंजाबी बोलीभाषेवर अचूक भर देण्यात आला आहे. ८०-९०च्या काळातील फॅशन आणि चित्रपटातील काॅस्च्युम यांचा मेळ बसवता आलेला नाही.

अभिनय : आमिर खाननं आपल्या परीनं लालचं कॅरेक्टर पूर्ण ताकदीनिशी साकारलं आहे, पण काही ठिकाणी त्यात पीकेची झलक दिसते. या वयात करीना कपूर आणि आमिर कॅालेजमध्ये हे पचत नाही. पुन्हा एकदा दोघांची केमिस्ट्री छान जमली आहे. करीनानं रुपाच्या व्यक्तिरेखेतील विविध पैलू यशस्वीरीत्या सादर केले असले तरी स्क्रीनवर तिचं वय जाणवतं. 'थ्री इडियटस'मध्ये करीनाची बहिण आणि आमिरची मेहुणी बनलेल्या मोना सिंगनं आईची भूमिका अत्यंत सुरेखपणे साकारली आहे. नागा चैतन्यच्या रूपात दक्षिणात्य बाळूही चांगला झाला आहे. मानव विजनं साकारलेला मोहम्मद भारताला शत्रू मानून तिथल्या नागरिकांच्या मनात विष कालवणाऱ्यांना मानवता धर्माचा सर्वात महत्त्वाचा संदेश देणारा आहे.

सकारात्मक बाजू : कलाकारांचा अभिनय, संगीत, नयनरम्य लोकेशन्स आणि नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी

नकारात्मक बाजू : चित्रपटाची लांबी, संथ गती, कला दिग्दर्शन, संकलन आणि काॅस्च्युम डिझायनिंग

थोडक्यात : हा चित्रपट जरी इंग्रजी चित्रपटाचा हिंदी रिमेक असला तरी ते कुठेही जाणवत नाही हे लेखकाचं यश असलं तरी लांबी मारक ठरणारी आहे. आमिर चाहते हा चित्रपट पाहतीलच, पण एक आई अपंग मुलातही आत्मविश्वास जागवून त्याला कशा प्रकारे  यशस्वी बनवू शकते हे जाणण्यासाठी हा चित्रपट पहायला हवा.
 

Web Title: Aamir khan and kareena Kapoor starrer Laal Singh Chaddha Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.