'२ स्टेट्स'मध्ये अर्जुन कपूर-आलियाच्या जागी दिसली असती 'ही' जोडी, चेतन भगत यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:33 IST2025-11-04T14:32:23+5:302025-11-04T14:33:29+5:30
जेव्हा फायनल स्टारकास्टची घोषणा झाली तेव्हा मीही चकीत झालो.

'२ स्टेट्स'मध्ये अर्जुन कपूर-आलियाच्या जागी दिसली असती 'ही' जोडी, चेतन भगत यांचा खुलासा
लेखक चेतन भगत यांची लोकप्रिय कादंभरी '२ स्टेट्स'वर आधारित सिनेमा २०१४ साली आला होता. हा सिनेमा तुफान चालला. अर्जुन कपूर आणि आलिया भटची जोडी लोकांना खूप आवडली. यातील गाणीही गाजली. पण अर्जुन आणि आलिया ही सिनेमासाठी पहिली पसंतीच नव्हती. मेकर्सने या सिनेमासाठी एका वेगळ्याच जोडीचा विचार केला होता. कोणती आहे ती जोडी?
'२ स्टेट्स'बद्दल लेखक चेतन भगत यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. या सिनेमासाठी सर्वात आधी शाहरुख खान आणि प्रियंका चोप्राचा विचार केला गेला होता असं ते म्हणाले आहेत. 'डॉन'मुळे ही जोडी सर्वांच्या आवडीचीच होती. चेतन भगत म्हणाले, "२ स्टेट्स खरं तर विशाल भारद्वाज बनवणार होते. तेव्हा शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रियंका चोप्रा यांना सिनेमात घेण्याविषयी चर्चाही झाली होती. मला वाटतं सर्वांच्या नावाचं आर्टिकलही आलं होतं. नंतर जेव्हा फायनल स्टारकास्टची घोषणा झाली तेव्हा मीही चकीत झालो. विशेषत: तेव्हा जेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांच्यावर दिग्दर्शनाची धुरा सोपवण्यात आली. तसंच अर्जुन कपूर आणि आलिया भट हे दोघं असणार हेही मला कळलं. अर्जुन आणि आलिया दोघांचा तोवर एक-एकच सिनेमा आला होता. हे सगळे बदल झाल्यावर मी ठिके म्हणालो पण माझ्याशी काहीही चर्चा झाली नव्हती."
ते पुढे म्हणाले, "काहीही म्हणा सिनेमाचं कास्टिंग खूपच चांगलं झालं. सिनेमात नवीन कलाकार होते त्यामुळे फ्रेश वाटलं. हेच जर वयस्कर कलाकार असते तर मला माहित नाही पण त्यांनीही चांगलंच काम केलं असतं. पण हे नक्कीच आश्चर्यकारक होतं."
शाहरुखचं कौतुक करताना चेतन भगत यांनी 'ओम शांती ओम'च्या सेटवरचा किस्सा आठवला. ते म्हणाले, "मी माझ्या आईसोबत सेटवर गेलो होतो. तेव्हा शाहरुखने स्वत: माझ्यासाठी खुर्ची समोर केली होती. तसंच मला निरोप देण्यासाठी तो स्वत: माझ्या कारपर्यंत आला होता. त्याच्या या अशा छोट्या छोट्या कृतीमुळे तो खरंच जेंटलमन आहे हे दिसून येतं."