रिअल तो रिअल होता है! नीना गुप्तांनी दाखवली 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी चप्पल, प्रिया बेर्डे कमेंट करत म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:46 IST2025-07-07T15:44:47+5:302025-07-07T15:46:43+5:30
Neena Gupta Kolhapuri Chappal Video: रिअल तो रिअल होता है ना...! 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी दाखवत नीना गुप्ता काय म्हणाल्या?

रिअल तो रिअल होता है! नीना गुप्तांनी दाखवली 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी चप्पल, प्रिया बेर्डे कमेंट करत म्हणाल्या...
Neena Gupta :कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चपलेची जगभरात ओळख आहे. अलिकडेच कोल्हापुरी चपलांची ‘प्रेरणा’ घेत इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने बनवलेले फूटवेअर मिलानमधील ‘स्प्रिंग/समर मेन्स कलेक्शन’मध्ये सादर केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सर्वच स्तरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर 'कोल्हापूरी'वर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
अलिकडेच अभिनेत्री करीना कपूरने सोशल मीडियावर 'कोल्हापुरी' चपलेचा खास फोटो शेअर करत 'प्राडा'वर निशाणा साधला होता. त्यानंतर आता नीना गुप्ता यांनी कोल्हापुरीचं तोंडभरुन कौतुक केलंय. शिवाय ही खास चप्पल त्यांना अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंनी भेट दिली होती, असा किस्साही त्यांनी या व्हिडीओद्वारे सांगितला आहे. दरम्यान, या व्हिडीओवर अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी कमेंट करत म्हटलंय की, "लक्ष्मीकांत बेर्डेंची ती आठवण अजुनही तुमच्या मनात कायम आहे, हेच आमच्यासाठी खूप आहे...".
नीना गुप्ता काय म्हणाल्या?
"आजकाल कोल्हापुरी चप्पल ही जबरदस्त चर्चेत आहे. मी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत एका प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की, तुम्ही मला कोल्हापूरवरून ही कोल्हापुरी चप्पल आणून द्याल का? तेव्हा त्यांनी लगेच हो म्हटलं होतं. त्यांनी मला ही कोल्हापुरी चप्पल आणून दिली होती. ही माझ्याकडे असेलली आत्तापर्यंत सगळ्यात सुंदर चप्पल आहे, आणि हातानं बनवलेली आहे. थॅंक्यू लक्ष्मीकांत...! तुम्ही आमच्यासोबत आता नाही आहात, पण खूप प्रेम...", असं नीना गुप्ता यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री नीना गुप्ता या सध्या 'पंचायत ४' वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. 'पंचायत ४'मधील मंजु देवीच्या भूमिकेत नीना गुप्तांनी पुन्हा एकदा लक्षवेधी काम केलंय. तसेच नुकताच त्यांचा 'मेट्रो इन दिनों' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.