Bigg Boss Marathi 6 मधील 'या' स्पर्धकाला प्रणित मोरेनं दिला पाठिंबा, म्हणाला "आनंद झाला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:02 IST2026-01-12T17:00:55+5:302026-01-12T17:02:44+5:30
'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व काल ११ जानेवारी २०२६ पासून सुरू झालं आहे.

Bigg Boss Marathi 6 मधील 'या' स्पर्धकाला प्रणित मोरेनं दिला पाठिंबा, म्हणाला "आनंद झाला..."
'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व काल ११ जानेवारी २०२६ पासून सुरू झालं आहे. 'दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!' असे म्हणत यंदाच्या पर्वाचे दार खुले झाले आहेत. अभिनेता रितेश देशमुख हा शो होस्ट करत असून, पुढचे १०० दिवस हा खेळ चालणार आहे. या पर्वात सोशल मीडियाचा लोकप्रिय चेहरा करण सोनावणे याने दिमाखात एन्ट्री घेतली आहे. करणच्या या एन्ट्रीने त्याचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. या प्रवासासाठी करणला सर्व स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहेत. अशातच 'बिग बॉस हिंदी' फेम प्रणित मोरे यानेही त्याला खास पाठिंबा दर्शवला आहे.
प्रणित मोरेने सोशल मीडियावर करण सोनावणेचा ग्रँड प्रीमियरमधील व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रणितने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिले, "भाऊ, तुला टीव्हीवर बघून खूप आनंद झाला आहे". दरम्यान, जेव्हा प्रणित 'बिग बॉस हिंदी'मध्ये होता, तेव्हा करण सोनावणे यानेदेखील त्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.

करण सोनावणे हा त्याच्या अफलातून विनोदी व्हिडिओमुळे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. फोकस इंडियन या नावाने करण सोनावणे इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. करणचं 'सोनावणे वहिनी'च्या लूकमधील रिलही चांगलंच व्हायरल झालं आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेला करण गेल्या काही वर्षात स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते आहेत. आता करण 'बिग बॉस'च्या घरात कसा टिकतो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.