सलमान सेटवर उशीरा यायचा? 'बॅटल ऑफ गलवान' फेम चित्रांगदा सिंहने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:19 IST2025-12-27T12:15:26+5:302025-12-27T12:19:05+5:30
'बॅटल ऑफ गलवान'च्या शूटिंगदरम्यान सलमान उशीरा यायचा? अभिनेत्री चित्रांगदा सिंहची 'त्या' चर्चांवर प्रतिक्रिया

सलमान सेटवर उशीरा यायचा? 'बॅटल ऑफ गलवान' फेम चित्रांगदा सिंहने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत
Chitrangda Singh On Battle On Galwan: बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) आज २७ डिसेंबरला त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता सलमान खान याशिवाय आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. या खास दिवशी, त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत बॉलिवू़ड अभिनेत्री चित्रांगदा सिंह देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या जोडीला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. अशातच आता चित्रांगदाने एका मुलाखतीत सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
अलिकडेच चित्रांगदा सिंहने झुमला मुलाखत दिली.त्यादरम्यान, तिला विचारण्यात आले की सलमान खान सेटवर उशिरा यायचा का?त्यावर अभिनेत्रीने अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. ती म्हणाली,"मी सुद्धा याबद्दल खूप ऐकलं होतं आणि मी हे खात्रीने सांगू शकते की ते एकही दिवस सेटवर उशिरा आलेले नाहीत.कधी-कधी, जेव्हा आम्ही एखाद्या महत्त्वाच्या सीनचे शूट असेल तेव्हा स्वतःचा सीन नसतानाही ते सेटवर हजर असायचे.रोज सकाळी १०:३० वाजता ते सेटवर यायचे. आणि फक्त एकच दिवस नाहीतर,तर सलग तीन दिवस यायचे."
चित्रांगदा पुढे म्हणाली,"प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतील.मी त्यांच्यासोबत माझा काम करण्याचा अनुभव सांगते आहे.ते प्रत्येक सीनसाठी खूप मेहनत घेतात.
आणि तो सीन अधिक चांगला कसा करता येईल,याचा सतत विचार करत असतात. एखादा सीन अशा प्रकारे लिहिला गेला आहे, त्यामुळे अशा पद्धतीने केला पाहिजे असं त्यांचं चालूच असतं. त्यांना ते करताना पाहून खूप छान वाटतं." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
‘बैटल ऑफ गालवान’ हा चित्रपट १५ जून २०२० रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या झटापटीत भारतीय लष्कराचे अनेक जवान शहीद झाले होते. सलमान खान या चित्रपटात कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहेत. कर्नल संतोष बाबू यांनी या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती.