असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 21:24 IST2025-10-20T21:20:38+5:302025-10-20T21:24:15+5:30
शेवटपर्यंत महाराष्ट्राचं आणि विशेषतः पुणे शहराचं ऋण असरानी विसरले नाहीत.

असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
बॉलिवूड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते असरानी (Asrani) यांंचं निधन झालं. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अप्रतिम कॉमिक टायमिंगमुळे त्यांनी ७०-८० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. 'शोले' चित्रपटातील त्यांची 'हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं' ही भूमिका आजही खूप लोकप्रिय आहे. असरानी यांचं महाराष्ट्राशी खास नातं होतं. जाणून घ्या
असरानी पुण्यात जाऊन करायचे ही खास गोष्ट
असरानी यांना लहानपणापासूनच अभिनयात रस होता, पण त्यांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीत काम करण्यास तीव्र विरोध होता. असरानींच्या वडिलांची इच्छा होती की, मुलाने मोठी होऊन सरकारी नोकरी करावी. पण असरानींना अभिनय करायचा होता. यामुळे त्यांनी घरात कोणालाही न सांगता गुरदासपूर येथून मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतरही त्यांना लगेच यश मिळालं नाही. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने त्यांनी १९६४ मध्ये पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथून ॲक्टिंगचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला.
कोर्स करूनही त्यांना सुरुवातीला चित्रपटांमध्ये फक्त छोटेखानी भूमिका मिळाल्या, ज्यामुळे ते निराश झाले. यामुळे ते पुन्हा पुण्यात आले आणि FTII मध्ये शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. पण त्यांनी अभिनयाचं स्वप्न सोडलं नाही. शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांचा अनेक चित्रपट निर्मात्यांशी संपर्क झाला.
Legendary Actor Asrani ji Passed Away. Om Shanti 🙏🏻#Asranipic.twitter.com/j7N8wwUYpq
— Sumit Kadel (@SumitkadeI) October 20, 2025
ऋषिकेश मुखर्जींनी दिला मोठा ब्रेक
अखेरीस १९६९ मध्ये दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'सत्यकाम' या चित्रपटातून त्यांना चांगली ओळख मिळाली. यानंतर, सुपरहिट ठरलेल्या 'गुड्डी' चित्रपटातील त्यांच्या विनोदी भूमिकेचं खूप कौतुक झाले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा वेळ असेल आणि कोणत्याही सिनेमाचं शूटिंग नसेल तेव्हा असरानी पुण्यातील येथील FTII मध्ये विद्यार्थ्यांना अभिनयाचं प्रशिक्षण द्यायला जायचे. अशाप्रकारे महाराष्ट्राचं आणि पुण्याचं ऋण ते विसरले नाहीत.
फुफ्फुसांच्या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज (२० ऑक्टोबर) संध्याकाळी ४ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.