अल्लू अर्जुननं तुरुंगात कशी काढली रात्र? पोलीस अधिकाऱ्याने दिली A टू Z माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 14:18 IST2024-12-15T14:17:53+5:302024-12-15T14:18:45+5:30
अल्लू अर्जूनला एक रात्र तुरुंगात काढावी लागली.

अल्लू अर्जुननं तुरुंगात कशी काढली रात्र? पोलीस अधिकाऱ्याने दिली A टू Z माहिती
Allu Arjun : हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2: द रूल'च्या 4 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या प्रीमियरला अल्लू अर्जुनने हजेरी लावली होती. याचवेळी चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली होती. हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी (13 डिसेंबर 2024 रोजी ) अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केली. अटकेनंतर लगेचच त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. पण, जामीन मंजूर झाल्यानंतरही त्याला अल्लू अर्जूनला एक रात्र तुरुंगात काढावी लागली.
अल्लू अर्जुनचा कैदी क्रमांक 7697 होता. तो रात्रभर चंचलगुडा तुरुंगातील बराकमध्ये होते. पोलिस अधिकाऱ्याने 'पीटीआय'ला सांगितले, 'अल्लू अर्जन अगदी सामान्य दिसत होता. तो उदास दिसत नव्हता. रात्रीची जेवणाची वेळ साधारणतः साडेपाच वाजता असते. तथापि, जे लोक उशिरा दाखल होतात त्यांना जेवण देखील दिले जाते. अभिनेत्याने भात आणि भाजी खाल्ली". अल्लू अर्जुनची सर्व माहिती कारागृहाच्या रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आली होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'अल्लू अर्जुनला सामान्य कैद्यांप्रमाणे वागणूक दिली जात होती. त्यानं तुरुंग प्रशासनाकडे कोणतीही मदत मागितली नाही.
अल्लू अर्जुनला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. पण, रात्री उशिरापर्यंत कारागृह अधिकाऱ्यांना जामिनाची प्रत मिळू शकली नाही. त्यामुळे अल्लू अर्जुनला 13 डिसेंबरची रात्र तुरुंगात काढावी लागली. तर अल्लू अर्जुनचे वकील अशोक रेड्डी यांनी हे पोलिसांनी मुद्दाम केल्याचा आरोप केला आहे. अर्जुनला शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता तुरुंगात आणण्यात आलं आणि शनिवारी, 14 डिसेंबर रोजी सकाळी 6:20 वाजता सोडण्यात आलं होतं. अल्लू अर्जून घरी येताच त्याची पत्नी स्नेहाने त्याला मिठी मारली आणि रडू लागली. तसेच त्याचा मुलाने वडिलांना मिठी मारली. अल्लू अर्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांचा हा भावुक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.