प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 09:27 IST2026-01-14T09:26:08+5:302026-01-14T09:27:06+5:30
काँग्रेसच्या रॅलीत आला आकाश ठोसर, तरुणाईमध्ये आजही 'सैराट'ची क्रेझ; निवडणूकीच्या धामधूमीत परश्याला पाहण्यासाठी झाली गर्दी

प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रभाग एकचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड. गोपाळ बुरबुरे यांच्या प्रचारार्थ काल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे 'सैराट' फेम लोकप्रिय अभिनेता आकाश ठोसर. परश्याला पाहण्यासाठी आणि काँग्रेसच्या या प्रचारात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी मोठी गर्दी केली होती.
आकाश ठोसरची क्रेझ, तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद
निवडणूक प्रचाराने आता चांगलाच जोर धरला असून, अॅड. गोपाळ बुरबुरे यांनी ग्रामीण भागात आपली पकड मजबूत करण्यासाठी पदयात्रा आणि रॅलींवर भर दिला आहे. आज निघालेली ही रॅली मतदारसंघातील विविध गावांतून मार्गस्थ झाली. अभिनेता आकाश ठोसर रॅलीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला. डोळ्यावर गॉगल, पांढरा शर्ट, जीन्स, गळ्यात काँग्रेसचा स्कार्फ दिसत आहे. आकाशचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्याने रॅलीदरम्यान सर्व मतदारांना अभिवादन केले. ग्रामीण भागातील महिला आणि तरुणांनी आकाशसोबत सेल्फी घेण्यासाठी आणि त्याला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. तसंच सैराटमधलाच आकाशचा सहकलाकार अभिनेता तानाजी गालगुंडेही रॅलीत सहभागी झाला होता. केवळ आणि केवळ आपल्या प्रभागाच्या विकासकामाच्या भवितव्यासाठी आकाश ठोसर काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा ही विनंती करण्यासाठी पदयात्रेत सहभागी होत आहे अशी पोस्ट गोपाळ बुरबुरे यांनी केली. गोपाळ बुरबुरे यांच्या फॅनपेजवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सध्या काँग्रेस गावागावातील उमेदवारांच्या रॅलीमध्ये ग्रामीण भागातून वर आलेल्या सेलिब्रिटींना सहभागी करुन घेत आहे. लातूरमध्ये आकाश ठोसर रॅलीमध्ये सहभागी झाला तर गौतमी पाटील काँग्रेसच्या चंद्रपूरातील रोड शोमध्ये दिसली होती. तर दुसरीकडे अभिनेत्री रवीना टंडनही प्रचारासाठी मैदानात उतरली होती. मुंबईतील उद्धव ठाकरे गटातील एका महिला उमेदवाराच्या प्रचारासाठी रवीना टंडन स्वत: पोहोचली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही मुंबई, ठाणे, पनवेल, नागपूर, पुणे अशा विविध शहरांमध्ये काही मराठी कलाकारांना मुलाखतीत दिल्या. एकूणच राजकीय पक्ष सेलिब्रिटींना घेऊन मतदारांमध्ये वेगळी हवा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.